सोलापूर - आत्महत्येपूर्वी पत्नीसाठी व्हिडिओ संदेश; जाकीर पटेल यांच्या मृत्यूने खळबळ
सोलापूर, 04 जून (हिं.स.)। सोलापूर शहरात कौटुंबिक वादातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे मानसिक त्रास होत असल्याचा आरोप करत एका ३८ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आह
सोलापूर - आत्महत्येपूर्वी पत्नीसाठी व्हिडिओ संदेश; जाकीर पटेल यांच्या मृत्यूने खळबळ


सोलापूर, 04 जून (हिं.स.)। सोलापूर शहरात कौटुंबिक वादातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे मानसिक त्रास होत असल्याचा आरोप करत एका ३८ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीचे नाव जाकीर अब्दुल रज्जाक पटेल (वय ३८) असे आहे. पत्नीच्या कथित प्रियकराकडून झालेल्या मारहाणीचा अपमान आणि त्यातून निर्माण झालेला मानसिक ताण सहन न झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपांची स्वतंत्र पडताळणी अद्याप झालेली नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी जाकीर पटेल यांनी पत्नीच्या नावे सुमारे सहा मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्याला होत असलेल्या मानसिक त्रासाबाबत कथन केल्याची चर्चा आहे. पोलिसांनी हा व्हिडिओ ताब्यात घेतला असून त्याची पडताळणी केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून, अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कौटुंबिक तणाव आणि मानसिक ताणतणावाच्या गंभीर परिणामांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पोलिस तपासानंतरच या प्रकरणातील सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande