
परभणी, 04 जून (हिं.स.)। अवैधरीत्या रेती वाहतूक करणार्या ट्रकवर परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कारवाई करत सुमारे 20 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी चालक व वाहन मालकाविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथक क्रमांक 1 चे पोलीस उपनिरीक्षक यशवंत वाघमारे, संदीप शिंदे, अर्जुन टर्के, ताटी कोडलवार, शेख इरशाद व लिंबाजी वावळे यांच्या पथकाने ही कारवाई सोनपेठ तालुक्यात केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, गस्तीदरम्यान ट्रक क्रमांक के.ए.33 ए 6147 हा संशयास्पदरीत्या रेती वाहतूक करताना आढळून आला. वाहनाची तपासणी केली असता चालकाकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक असलेली रॉयल्टी तसेच वैध वाहतूक परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान ट्रकमधील रेती ही विनापरवाना वाहतूक केली जात असून ती शासनाची मालमत्ता असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी ट्रकसह रेती असा एकूण 20 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी छत्रपती लक्ष्मण चापळे (वय 38) व वाहन मालक किरण बापूराव चापळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पर्यावरण संरक्षण अधिनियम, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis