मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तिघांचा मृत्यू
सशस्त्र गटांमध्ये तब्बल अर्धा तास चालली चकमक कांगपोकपी, 05 जून (हिं.स.) : मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आदिवासीबहुल लोइबोल खुल्लेन गावावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आणि त्यानंतर झाल
मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात सुरक्षादलाचे जवान मोर्चा सांभाळताना


सशस्त्र गटांमध्ये तब्बल अर्धा तास चालली चकमक

कांगपोकपी, 05 जून (हिं.स.) : मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आदिवासीबहुल लोइबोल खुल्लेन गावावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला, तर अनेक घरे जाळण्यात आली.

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एका अज्ञात गटाशी संबंधित सशस्त्र सदस्यांनी गावावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तेथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या सशस्त्र गटाने गोळीबार सुरू केला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये सुमारे अर्धा तास तीव्र चकमक सुरू होती.

या क्रॉसफायरमध्ये तीन निष्पाप ग्रामस्थांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख लेतखोंगाम हाओकिप, त्यांची पत्नी टिनमैरी हाओकिप आणि जांगमिनलाल हाओकिप अशी करण्यात आली आहे.

घटनेनंतर गावात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जीव वाचवण्यासाठी अनेक ग्रामस्थांनी आपली घरे सोडून जवळच्या जंगलांमध्ये आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला.

हल्लेखोरांनी गावातील अनेक घरांना आग लावली. या आगीत किमान सात घरे पूर्णपणे जळून खाक झाली असून ग्रामस्थांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळी रवाना करण्यात आले. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालून आरोपींचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे.दरम्यान, कुकी आदिवासींची प्रमुख संघटना कुकी इन्पी मणिपूर (केआयएम) यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. संघटनेने घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींना अटक करण्याची मागणी केली आहे.

केआयएमचे सचिव जांघोलम हाओकिप यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निष्पाप नागरिकांची हत्या तसेच त्यांची घरे आणि उपजीविकेची साधने नष्ट करणे हे मानवी प्रतिष्ठा आणि मूलभूत मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन आहे.

ते पुढे म्हणाले की, नागरिकांना जाणीवपूर्वक लक्ष्य करणे आणि त्यांची घरे उद्ध्वस्त करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाही. केआयएमने पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करत लोइबोल खुल्लेन गावातील प्रभावित नागरिकांसोबत एकजूट दर्शवली आहे.

संघटनेने भारत सरकार आणि संबंधित सुरक्षा यंत्रणांना या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना लवकरात लवकर अटक करण्याचे तसेच संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचे आवाहन केले आहे.सुरक्षा दलांनी परिसरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande