लातूरमध्ये वाहनचोरीतील आरोपी अटकेत; १.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर, 05 जून (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात वाहन चोरीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी लातूर स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत वाहन चोरीच्या
पोलीस कारवाई


लातूर, 05 जून (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात वाहन चोरीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी लातूर स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत वाहन चोरीच्या दोन गुन्ह्यांतील आरोपीस अटक करून एकूण १ लाख २० हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पथकाकडून वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना माहितीदारामार्फत कातपूर रोडवर एक संशयित इसम टाटा एसीई एक्सएल मालवाहू वाहनासह थांबलेला असल्याची माहिती प्राप्त झाली. माहितीची खातरजमा करून संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. तेथे एक इसम टाटा कंपनीचे TATA ACE XL मालवाहू वाहन (क्र. MH-01-CR-7583) घेऊन संशयास्पदरीत्या उभा असल्याचे आढळून आले. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव १) अकबर सत्तार शेख (वय ३० वर्षे, रा. आष्टा, ता. चाकूर, जि. लातूर) असे सांगितले.

सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये नंबर प्लेट नसलेली काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल आढळून आली. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने संबंधित मोटारसायकल ही लातूर शहरातील संजयनगर परिसरातून तर TATA ACE XL मालवाहू वाहन हे किल्लारी परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली.

त्यानंतर लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या अभिलेखांची पडताळणी केली असता मोटारसायकल चोरीप्रकरणी पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर येथे गुरनं. ४०९/२०२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल असल्याचे तसेच मालवाहू वाहन चोरीप्रकरणी पोलीस ठाणे किल्लारी येथे गुरनं. १७६/२०२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

सदर कारवाईत हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (काळ्या रंगाची) किंमत अंदाजे ४० हजार रुपये; TATA ACE XL मालवाहू वाहन किंमत अंदाजे ८० हजार रुपये असा एकूण एक लाख वीस हजार रुपये किंमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी अकबर सत्तार शेख यास ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर येथे हजर करण्यात आले आहे. तसेच चोरीच्या इतर गुन्ह्यांबाबत त्याच्याकडे अधिक तपास सुरू असून अकबर शेख पोलीस ठाणे किल्लारी येथील एका गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande