
गुवाहाटी, 05 जून (हिं.स.)। दीर्घकाळ सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत आसाम मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्व सरमा यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या १२ आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. या विस्तारानंतर प्रस्तावित १९ सदस्यीय मंत्रिमंडळातील आतापर्यंत १७ पदे भरली गेली आहेत.
नवनियुक्त मंत्र्यांमध्ये ११ आमदार भारतीय जनता पक्षाचे (भाजप) असून, एक आमदार सहयोगी पक्ष असम गण परिषद (अगप) यांचा आहे. ज्योती-बिष्णू आंतरराष्ट्रीय कला मंदिर येथे आयोजित शपथविधी समारंभात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये डॉ. रणोज पेगू, अश्विनी राय सरकार, विश्वजीत दैमारी, पीयूष हजारिका, अशोक सिंघल, कृष्णेंदू पाल, नीलिमा देवी, जयंत मल्ल बरुवा, कौशिक राय, बिमल बोरा, सुशांत बरगोहाई आणि केशव महंत यांचा समावेश आहे. यांपैकी केशव महंत हे अगपचे एकमेव आमदार असून, उर्वरित सर्व मंत्री भाजपशी संबंधित आहेत.
विशेष बाब म्हणजे, शपथ घेणाऱ्या मंत्र्यांपैकी चौघांना प्रथमच मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. तसेच, सहयोगी पक्ष असम गण परिषदेकडून आता मंत्रिमंडळात अतुल बोरा आणि केशव महंत असे दोन प्रतिनिधी आहेत. त्याचप्रमाणे, एनडीएचा आणखी एक सहयोगी पक्ष असलेल्या बीपीएफचे प्रतिनिधित्व चरण बोरो करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule