मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल स्थिती, किनारपट्टीवर ढगांची दाटी, लवकरच महाराष्ट्र व्यापणार
मुंबई, 05 जून (हिं.स.) - गेल्या दोन महिन्यांपासून गरमीने शरीराची लाही लाही करणाऱ्या उन्हात दिलासादायक बाब काल, गुरुवारी मान्सून भारताच्या वेशीवर म्हणजे केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामानाची स्थिती अनुकूल आहे, अशी माह
पाऊस


मुंबई, 05 जून (हिं.स.) - गेल्या दोन महिन्यांपासून गरमीने शरीराची लाही लाही करणाऱ्या उन्हात दिलासादायक बाब काल, गुरुवारी मान्सून भारताच्या वेशीवर म्हणजे केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामानाची स्थिती अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे मान्सूनचा उत्तर दिशेकडील प्रवास सुरू झाला आहे. दरम्यान, सॅटेलाइट प्रतिमांमध्ये केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीवर शुक्रवारी दाट ढगांची दाटी दिसून येत असून ढगांचा हा पट्टा तळकोकणाच्या जवळपास पोहोचल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे लवकरच राज्यात मोसमी वाऱ्यांचे आगमन होईल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.

अंदमान येथे १६ मे रोजी दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल काहीशी संथ गतीने सुरू होती. त्यामुळे मान्सून केरळ किनारपट्टीवर कधी दाखल होतो, याकडे देशासह महाराष्ट्रातील नागरिक चातकासारखी वाट पाहत होते. अखेर गुरुवारी केरळच्या किनापट्टीवर मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली. मोसमी वाऱ्यांनी आग्नेय बंगालचा उपसागर, कर्नाटकचा काही भाग, तामिळनाडू, कोमोरिन परिसराचा उर्वरित भाग, केरळ, नैऋत्य व आग्नेय अरबी समुद्राच्या उर्वरित भागात वाटचाल केली आहे, अशी माहिती हवामान विभागाने गुरुवारी दिली.

ढगांचा हा पट्टा हळूहळू तळकोकणाच्या दिशेने सरकत आहे. पुढील ४८ तासांत हीच स्थिती कायम राहिली, तर तळकोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी हवामानाची ही स्थिती अनुकूल मानली जाते. पुढील २ ते ३ दिवसांत नैऋत्य मोसमी वारे आणखी पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असून राज्यातील दक्षिण किनारपट्टीवर पुढील काही दिवसात मोसमी वारे दाखल होतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार, रविवार ७ जून किंवा सोमवार ८ जून रोजी राज्याच्या दक्षिण किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. मात्र, स्थिती अनुकूल राहिल्यास या अंदाजाच्या आधीही मान्सून गोव्यासह तळकोकणात दाखल होण्याची शक्यता आहे.

माॅन्सूनने आज कर्नाटक, तमिळनाडू आणि गोव्याच्या काही भागात प्रगती केली आहे. गोव्याच्या काही भागात, कर्नाटक आणि तमिळनाडूच्या आणखी काही भागात माॅन्सूनने चाल केली. तसेच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातही माॅन्सूनने प्रगती केली. माॅन्सूनची सीमा आज गोव्यातील पणजी, कर्नाटकातील बंगळूरू तर तमिळनाडूतील सालेम आणि पामबम भागात होती.

राज्यात पुढील ५ दिवस अनेक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उद्याही संपूर्ण कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्येही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

रविवारी आणि कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्येही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande