
बेंगळुरू, 05 जून (हिं.स.)। अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी)चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटकमधून राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्यसभा निवडणूक १८ जून रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना के. सी. वेणुगोपाल, राहुल गांधी, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, रणदीप सिंह सुरजेवाला तसेच कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी (केपीसीसी)चे अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
शुक्रवारी बेंगळुरू येथील विधान सौधामध्ये एआयसीसीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर राज्यसभेसाठी औपचारिकपणे आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, त्यांच्या उमेदवारीला पक्षातील सर्व आमदार आणि नेत्यांचा एकमताने पाठिंबा आहे. ते म्हणाले, आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सर्व आमदार आणि पक्षाच्या नेत्यांनी मला उमेदवार म्हणून निवडले आहे. त्यांच्या विश्वासाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
खर्गे यांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या विजयाबाबत पूर्ण विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, पक्षाची एकजूट, शिस्त आणि संघटित कार्यपद्धती हीच काँग्रेसची सर्वात मोठी ताकद आहे. ते पुढे म्हणाले की, आमदार, नेते आणि कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे काम केल्यास काँग्रेस उमेदवारांचा विजय निश्चित आहे. खर्गे यांनी विश्वास व्यक्त केला की, काँग्रेसचे सर्व उमेदवार या निवडणुकीत यश मिळवतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule