
विजेतेपदाच्या शर्यतीत कायम
ओस्लो (नॉर्वे), 05 जून (हिं.स.)। नॉर्वे बुद्धिबळ २०२६ स्पर्धेच्या नवव्या फेरीत शुक्रवारी उत्कंठा शिगेला पोहोचली. भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंद याने विद्यमान विश्वविजेता डी. गुकेश याचा पराभव करून विजेतेपदाची शर्यत अखेरच्या फेरीपर्यंत जिवंत ठेवली. तर महिला गटात बिबीसारा अस्साउबायेवा हिने एक फेरी बाकी असतानाच विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
खुल्या गटात अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसन आणि अमेरिकेचा वेस्ली सो यांच्यातील क्लासिकल सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर झालेल्या आर्मागेडन सामन्यात वेस्ली सो याने विजय मिळवत अतिरिक्त गुणांची कमाई केली आणि अंतिम फेरीपूर्वी आपली आघाडी कायम राखली. दिवसातील सर्वात मोठा निकाल भारतीय खेळाडूंमधील लढतीत पाहायला मिळाला. काळ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रज्ञानानंदने गुकेशचा पराभव केला. मधल्या टप्प्यात (मिडल गेम) प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण केल्यानंतर प्रज्ञानानंदने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सामना आपल्या नावावर केला आणि पूर्ण तीन गुण मिळवले. या विजयामुळे प्रज्ञानानंदचे १५ गुण झाले असून तो आता आघाडीवर असलेल्या वेस्ली सोपेक्षा केवळ अर्ध्या गुणाने मागे आहे.
दुसरीकडे, फ्रान्सचा अलीरेझा फिरुझा हाही विजेतेपदाच्या शर्यतीत कायम आहे. त्याने क्लासिकल सामन्यात कठीण परिस्थितीतून पुनरागमन केले आणि त्यानंतर आर्मागेडनमध्ये व्हिन्सेंट कीमर याचा पराभव करून अतिरिक्त गुण मिळवले.
नवव्या फेरीनंतरची गुणतालिका :
वेस्ली सो — १५.५ गुण
प्रज्ञानानंद — १५ गुण
अलीरेझा फिरुझा — १४.५ गुण
महिलांमध्ये बिबीसारा ठरली विजेती
महिला गटात कझाकस्तानच्या बिबीसारा अस्साउबायेवा हिने एक फेरी आधीच नॉर्वे बुद्धिबळ महिला विजेतेपद पटकावले.
तिने युक्रेनच्या अॅना मुझीचुक हिच्याविरुद्धचा क्लासिकल सामना अनिर्णित राखला. त्यानंतरच्या आर्मागेडन सामन्यात मुझीचुकने अतिरिक्त गुण मिळवले, मात्र तरीही बिबीसाराची आघाडी गणिती दृष्ट्या अभेद्य ठरली.महिला गटातील दिवसातील एकमेव क्लासिकल विजय चीनच्या झू जिनर हिने भारताच्या दिव्या देशमुख हिचा पराभव करून मिळवला. तर भारताची कोनेरू हम्पी आणि विद्यमान महिला विश्वविजेती जू वेनजुन यांच्यातील क्लासिकल सामना अनिर्णित राहिला. मात्र आर्मागेडनमध्ये जू वेनजुन हिने विजय मिळवला.
महिला गटाची गुणतालिका (नवव्या फेरीनंतर) :
बिबीसारा अस्साउबायेवा — १६.५ गुण (विजेती)
झू जिनर — १३ गुण
अन्ना मुज़ीचुक — १२ गुण
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule