
काकामिगाहारा (जपान), 05 जून (हिं.स.)। भारतीय अंडर-18 महिला हॉकी संघाचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न शुक्रवारी अत्यंत रोमांचक सामन्यात भंगले. महिला अंडर-18 आशिया चषक 2026 च्या उपांत्य फेरीत भारताने चीनला कडवी झुंज दिली, मात्र नियोजित वेळेत सामना 2-2 असा बरोबरीत राहिल्यानंतर शूटआऊटमध्ये 1-3 ने पराभव स्वीकारावा लागला. यासह चीनने अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताकडून नौशीन नाझ हिने तिसऱ्या मिनिटाला, तर किरण एक्का हिने 54 व्या मिनिटाला गोल केले. चीनकडून ली झेयान हिने 24 व्या मिनिटाला आणि झांग युझेंग हिने 48 व्या मिनिटाला गोल नोंदवले.
भारताने सामन्याची सुरुवात शानदार पद्धतीने केली. तिसऱ्याच मिनिटाला कर्णधार स्वीटी कुजूर हिच्या उत्कृष्ट पासवर नौशीन नाझ हिने डीच्या आतून दमदार फटका मारत चेंडू जाळ्यात धाडला आणि भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी संधी निर्माण केल्या, मात्र आणखी कोणताही गोल झाला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये चीनला 21 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण भारतीय गोलरक्षक महक परिहार हिने अप्रतिम बचाव केला. मात्र 24 व्या मिनिटाला भारतीय बचावफळीतील चुकीचा फायदा घेत ली झेयान हिने मैदानी गोल करत चीनला बरोबरी साधून दिली. तर तिसऱ्या क्वार्टरमध्ये चीनने चेंडूवर अधिक वेळ नियंत्रण ठेवले, पण भारतीय खेळाडूंनी भक्कम बचाव केला. भारतालाही सलग पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र संघाला आघाडी मिळवता आली नाही. चौथ्या क्वार्टरमध्ये 48 व्या मिनिटाला चीनने पेनल्टी कॉर्नरवर आघाडी घेतली. सुरुवातीचा फटका रोखण्यात आल्यानंतर मिळालेल्या रिबाऊंडवर झांग युझेंग हिने गोल करत चीनला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
तथापि, भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले आणि 54 व्या मिनिटाला किरण एक्का हिने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत सामना पुन्हा 2-2 असा बरोबरीत आणला. नियोजित वेळेत आणखी कोणताही गोल न झाल्याने सामन्याचा निकाल शूटआऊटद्वारे लावण्यात आला. शूटआऊटमध्ये चीनची गोलरक्षक लियू शुए हिने उत्कृष्ट बचाव केले आणि चीनने 3-1 असा विजय मिळवला. चीनकडून लू टोंग टोंग, गे चेन आणि गुओ जियाशिन यांनी गोल केले, तर भारताकडून केवळ संदीपा कुमारी हिलाच गोल करता आला.
आता भारतीय संघ 6 जून रोजी सकाळी 9.30 वाजता कांस्यपदकाच्या सामन्यात जपान आणि कोरिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील पराभूत संघाविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule