घरफोड्यांच्या मालिकेने डोंबिवलीतील रहिवासी धास्तावले; पोलिस गस्त वाढविण्याची मागणी
डोंबिवली, 05 जून (हिं.स.)। डोंबिवली पूर्व येथील आर. जी. पाटीलवाडी आणि नांदिवली परिसरातील नव अंबिका पूजा आणि काही जवळच्या सोसायटीमध्ये पहाटेच्या वेळी चोरट्यांनी धाडसी चोरी करत एकाच वेळी पाच ते सहा बंद घरांचे कुलूप तोडल्याची घटना घडली. या घटनेमुळे स
डोंबिवली


डोंबिवली, 05 जून (हिं.स.)। डोंबिवली पूर्व येथील आर. जी. पाटीलवाडी आणि नांदिवली परिसरातील नव अंबिका पूजा आणि काही जवळच्या सोसायटीमध्ये पहाटेच्या वेळी चोरट्यांनी धाडसी चोरी करत एकाच वेळी पाच ते सहा बंद घरांचे कुलूप तोडल्याची घटना घडली. या घटनेमुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्री व पहाटेच्या गस्तीत वाढ करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नव अंबिका पूजा सोसायटीच्या 'ए' विंगमधील दुसऱ्या मजल्यावरील तीन बंद फ्लॅट्सना अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. पहाटेच्या सुमारास ही चोरी झाल्याचे समोर आले असून, संबंधित घटनेची तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

सोसायटी मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर असल्याने रात्रीच्या वेळी परिसरात वर्दळ कमी असते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर रहिवाशांमध्ये सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर सोसायटीच्या कमिटी सदस्यांनी आणि रहिवाशांनी टिळकनगर पोलिसांकडे लेखी निवेदन देत रात्री ११ ते पहाटे ५ या कालावधीत परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. पोलिसांची नियमित गस्त, बीट मार्शलच्या फेऱ्या आणि गस्ती वाहनाची उपस्थिती वाढविल्यास गुन्हेगारांवर वचक बसेल आणि भविष्यात अशा घटनांना आळा बसेल, असा विश्वास रहिवाशांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande