
तेहरान, 08 जून (हिं.स.)।इस्त्रायल-इराण युद्धादरम्यान एक मोठी घडामोड समोर आली आहे. इराणने इशारा देत इस्त्रायलविरुद्ध सुरू असलेली आपली लष्करी मोहीम थांबवल्याची घोषणा केली आहे.
इराणच्या सरकारी माध्यमांनुसार, इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने इस्त्रायलविरोधातील सध्याच्या लष्करी कारवायांचा समारोप जाहीर केला आहे. मात्र, इस्त्रायलने लेबनॉनवरील हल्ले सुरूच ठेवले तर त्याहून अधिक कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
सोमवारी इराणी लष्कराने जाहीर केले की, रविवारी उशिरा रात्री दोन्ही देशांदरम्यान झालेल्या चकमकीनंतर ते इस्त्रायलविरुद्धची कारवाई थांबवत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरान आणि तेल अवीव यांच्यात तातडीच्या युद्धविरामाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितल्यानंतर इराणचे हे वक्तव्य समोर आले आहे.
तेहरानकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलने मध्य आणि पश्चिम इराणमधील काही भागांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमुळे संपूर्ण मध्य पूर्वेत व्यापक प्रादेशिक युद्ध भडकण्याची भीती निर्माण झाली होती.
इराणच्या सरकारी दूरदर्शनने इस्फहान, कराज, तब्रीज आणि तेहरान येथे स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त दिले. मात्र, या घटनांबाबत तत्काळ कोणतीही सविस्तर माहिती देण्यात आली नाही. तेहरानमधील प्रत्यक्षदर्शींनी राजधानीच्या पश्चिम भागात जोरदार स्फोट झाल्याचे सांगितले.
इराणी अधिकाऱ्यांनी कोणत्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले किंवा किती नुकसान झाले याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने दावा केला की, इस्त्रायलने सोमवारी सकाळी केलेल्या हल्ल्यांमध्ये हवेतून डागल्या जाणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला. मात्र, यासंदर्भात अधिक तपशील देण्यात आलेला नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode