
रायगड, 08 जून (हिं.स.)। : घोडा शर्यतीतील पैशाच्या व्यवहारातून सुरू झालेला वाद थेट मारहाण, घरासमोर धिंगाणा आणि जीवे मारण्याच्या धमकीपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना माथेरानमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी माथेरान पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे आपल्या मित्रासोबत माथेरान येथील दिवाडकर हॉटेलमध्ये बसले होते. त्यावेळी आरोपी क्रमांक १ याने फिर्यादीकडे घोडा शर्यतीसाठी दिलेल्या पैशांपैकी १३ हजार ५५० रुपये बाकी असल्याचे सांगून तत्काळ पैशांची मागणी केली. फिर्यादीने पैसे नंतर देण्याचे सांगताच आरोपी संतापला आणि त्याने फिर्यादीच्या कानशिलात लगावल्याचा आरोप आहे.
यावेळी इतर आरोपीही आक्रमक झाल्याने फिर्यादी तेथून निघून आपल्या घरी गेले. मात्र त्यानंतर आरोपींनी आणखी काही साथीदारांना सोबत घेत थेट फिर्यादीच्या घरासमोर धडक दिली. मोठमोठ्याने आरडाओरडा करत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. नाक्यावर येऊन माफी माग, नाहीतर कोयत्याने छाटून ठार करू, अशी धमकी देत शिवीगाळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
इतकेच नव्हे तर आरोपींनी फिर्यादीच्या घराचे किरकोळ नुकसान केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या गोंधळामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी माथेरान पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४/२०२६ अन्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत. या घटनेमुळे माथेरानमध्ये चर्चांना उधाण आले असून पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)