
बीड, 08 जून (हिं.स.)। अंबाजोगाई येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर दोघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी अत्याचाराचे फोटो आणि व्हिडिओ कुटुंबाला दाखवण्याची धमकी देत पीडितेकडून तीन लाख रुपयांची रोकड आणि साडेनऊ तोळे सोने लुटले. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पीडित तरुणी अंबाजोगाई येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी राहत असताना तिची ओळख दोन तरुणांशी झाली. हे दोघे तिचा सतत पाठलाग करत असत. एके दिवशी तरुणीला जबरदस्तीने मंचुरियन खाऊ घातले, ज्यामध्ये गुंगीचे औषध मिसळले होते. तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला गुंगीचे औषध देऊन पुणे येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. दोन्ही आरोपींनी या कृत्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व नातेवाईकांना दाखवण्याची धमकी देत पीडितेला ब्लॅकमेल करणे सुरू केले. या भीतीपोटी आरोपींनी पीडितेकडून वेळोवेळी तीन लाख रुपये आणि साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने उकळले. हा छळ असह्य झाल्याने शेवटी पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis