
सोलापूर, 08 जून (हिं.स.)। पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत भाळवणी आणि तिसंगी परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी एकाच दिवशी सलग चार ठिकाणी पोलीस निरीक्षक रेखा घनवट यांनी छापेमारी करून मोठी कारवाई केली. या कारवाईत अवैध दारू विक्री करणाऱ्या चार जणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून देशी-विदेशी दारू आणि बीअर असा एकूण १४,७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तिसंगी येथे पत्राशेडच्या मागील बाजूस टाकलेल्या छाप्यात पप्पू पाटील याला बेकायदेशीर देशी दारू विक्री करताना पकडण्यात आले. भाळवणी येथे नितीन पवार (वय ३६, रा. भाळवणी) याच्याकडून देशी दारू संत्रा अशा एकूण २८ बाटल्या (किंमत २,८१० रुपये) जप्त करण्यात आल्या.तसेच भाळवणीतील तृप्ती हॉटेलजवळ भिमराव शेरकर याच्याकडे पांढऱ्या पिशवीत ठेवलेला १०,९५० रुपयांचा विदेशी दारू व बीअरचा साठा आढळून आला. स्नेहा गार्डन परिसरात करण्यात आलेल्या सायंकाळच्या कारवाईत हुसेन आलिम पटेल (वय ३६, रा. भाळवणी) याला देशी दारू आणि इम्पेरियल ब्लूच्या बाटल्यांसह ताब्यात घेण्यात आले.पोलिसांनी या कारवायांमुळे परिसरातील अवैध दारू विक्रीवर आळा बसत असल्याचे सांगितले असून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड