
न्यू चंदीगड, 08 जून (हिं.स.)एकमेव कसोटी सामन्यात भारताने अफगाणिस्तानला एक डाव आणि ३०० धावांनी पराभूत केले. भारताने आपला पहिला डाव ८ गडी बाद ५६४ धावांवर घोषित केला आणि तिसऱ्या दिवशी अफगाणिस्तानला १५२ धावांवर सर्वबाद केले. यामुळे भारताला ४१२ धावांची आघाडी मिळाली आणि अफगाणिस्तानला फॉलो-ऑन खेळावा लागला. दुसऱ्या डावात अफगाणिस्तानची फलंदाजी खराब झाली आणि त्यांना केवळ ११२ धावा करता आल्या. दुसऱ्या डावात अफगाणिस्तानने नऊ गडी गमावले, पण अश्रफ फलंदाजीसाठी आला नाही.
भारताचा हा एक डाव आणि ३०० धावांनी मिळवलेला विजय, कसोटी क्रिकेटमधील डावाच्या फरकाने मिळवलेला टीम इंडियाचा सर्वात मोठा विजय ठरला. इतकेच नव्हे तर, भारताने २०२३ नंतर प्रथमच घरच्या मैदानावर कसोटीत ५५० पेक्षा जास्त धावा केल्या. ५६४ धावा ही अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाने केलेली दुसरी सर्वोच्च धावसंख्या होती. पण, हा सामना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग नसल्यामुळे, भारतीय संघाला गुणतालिकेत कोणताही फायदा झाला नाही.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, भारताने सावध सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ४१ धावा जोडल्या. जैस्वाल २४ धावांवर बाद झाला, पण त्यानंतर केएल राहुल आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून भारताला मजबूत स्थितीत आणले. राहुलने शानदार फलंदाजी करत १६५ चेंडूंमध्ये १०० धावा केल्या आणि आपले कसोटी शतक पूर्ण केले. साई सुदर्शनने १०४ चेंडूंमध्ये ८१ धावांची उपयुक्त खेळी केली. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलने सूत्रे हाती घेतली आणि एक शानदार शतक झळकावले. गिलने १७७ चेंडूंमध्ये १५ चौकार आणि एका षटकारासह १२६ धावा केल्या.
ऋषभ पंतनेही आक्रमक फलंदाजी करत ८१ धावा केल्या. गिल आणि पंतने चौथ्या विकेटसाठी १६९ धावांची भागीदारी केली, जी कसोटी क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध भारताची सर्वोच्च भागीदारी ठरली. खालच्या फळीत वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ५२ धावा केल्या. भारताने आपला पहिला डाव ८ गडी बाद ५६४ धावांवर घोषित केला.
या मोठ्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना, भारतीय गोलंदाजांसमोर अफगाणिस्तानची फलंदाजी पूर्णपणे कोसळली. रहमत शाह अर्धशतक करण्यासाठी झगडत होता, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून महत्त्वपूर्ण साथ मिळाली नाही. या कसोटीत भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात सहा बळी घेत अफगाण फलंदाजांना सातत्याने अडचणीत आणले. प्रसिद्ध कृष्णानेही महत्त्वपूर्ण बळी घेतले. अफगाणिस्तानचा संघ १५२ धावांवर सर्वबाद झाला, ज्यामुळे भारताला ४१२ धावांची मोठी आघाडी मिळाली होती.
पहिल्या डावात मोठी आघाडी घेतल्यानंतर भारताने फॉलो-ऑन दिला. मात्र, दुसऱ्या डावातही पाहुण्या संघाच्या फलंदाजीत सुधारणा झाली नाही. अफगाणिस्तानकडून सेदिकुल्ला अटलने सर्वाधिक ४२ धावा केल्या. संपूर्ण संघ केवळ ११२ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात केवळ तीन फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. भारतासाठी वॉशिंग्टन सुंदरने चार बळी घेतले, तर कुलदीप यादवने तीन फलंदाजांना बाद केले. मानव सुथार आणि मोहम्मद सिराजनेही एकेक बळी घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे