
लासलगाव, 08 जून (हिं.स.)
- कांद्याच्या लिलावामध्ये नाफेड आणि एन सी एफ ने सहभागी होण्याचे आदेश दिल्यानंतर देखील या दोन्हीही संस्था सोमवारी सहभागी न झाल्याने या दोन्हीही संस्थांची कांदा खरेदी योजनेचा बोजवारा उडाला आहे. याबाबत नाफेडच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. नाफेड आणि एनसीएफने घेतलेल्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये या दोन्हीही सरकारी संस्थांच्या बाबत असलेला संताप अधिकच वाढला आहे
कांद्याचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून सतत त्याने कांद्याचे भाव पडत आहे मागील काही दिवसापूर्वी तर कांद्याचे भाव क्विंटलला पाचशे आणि सहाशे रुपये पर्यंत आलेले होते म्हणजेच बाजारामध्ये पाच रुपये आणि सहा रुपये प्रति किलो भावाने कांदा विकला जात होता असं सर्व असताना देखील मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आणि बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांनी उचललेल्या पावलांमुळे कांद्याचे भाव हे पुन्हा बाराशे तेराशे रुपयांच्या घरात गेले आणि आता शासनाने नाफेड व एन सी एफ या सरकारी यंत्रणेमार्फत कांदा खरेदी करण्यासाठी 1580 रुपये इतका भाव निश्चित करून कांदा खरेदी योजना सुरू केली.
ही कांदा योजना सरकारी यंत्रणेमार्फत सुरू करत असताना यावेळी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुरुवातीपासूनच लक्ष ठेवले आणि ही योजना सुरू झाल्यानंतर आठ दिवसांमध्ये मिळत असलेल्या प्रतिसाद लक्षात घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या सहभाग व्हावा यासाठी म्हणून रविवारी सात जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार आणि नाफेड एनसीएफचे प्रतिनिधी यांची बैठक बोलवली होती या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष बाजार समितीमध्ये आणलेला कांदा हा नाफेड आणि एनसीएफने खरेदी करावा अशी भूमिका लोकप्रतिनिधी घेतल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील याबाबतचे निर्देश नाफेड आणि एनसीएफ ला दिले होते त्याबाबत तातडीने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आदेशही देण्यात आलेले होते.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिलेल्या आदेशानुसार आज सोमवारपासून एनसीएफ आणि नाफेड या दोन्हीही सरकारी यंत्रणा प्रत्यक्ष बाजार समितीमध्ये जाऊन कांदा खरेदी सुरू करतील अशी अपेक्षा होती परंतु ही अपेक्षा पूर्णपणे निराशा जनक झाले असून आज सकाळपासून जिल्ह्यात आशिया खंडामधील कांद्याचे सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये नाफेड आणि एनसीएफचे प्रतिनिधी येऊन कांदा खरेदी करतील अशी अपेक्षा होती परंतु या ठिकाणी एकही अधिकारी आला नाही पिंपळगाव विंचूर निफाड चांदवड मालेगाव बागलाण या महत्त्वाच्या कांद्याच्या बाजारपेठांमध्ये देखील अशीच परिस्थिती राहिली त्यामुळे नाफेड आणि एनसीएफचे अधिकारी प्रत्यक्ष बाजारामध्ये जाऊन कांदा खरेदी करण्यात अपयशी ठरले आणि त्यांच्यामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे.
चौकट
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिलेल्या आदेश हे नाफेड आणि एनसीएफचे अधिकाऱ्यांनी मानले नाही या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना केली असून यावर या अधिकाऱ्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे म्हणजेच जिल्हा प्रशासनापेक्षाही नाफेड आणि एनसीएफ स्वतःला अधिक मोठे समजत असून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यापेक्षा त्यांना वेठीस धरण्याचा काम या दोन्हीही संस्थांनी केल्यामुळे जिल्ह्यामध्ये अजूनच नाराजी पसरली आहे.
चौकट
महाराष्ट्र कांदा शेतकऱ्यांच्या नेत्यांचे उग्र आंदोलन
नाफेड व एनसीएफने कांदा लिलावामध्ये प्रत्यक्ष भाग घेतला नाही त्यानंतर या सर्व प्रश्नावरती महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे नेते भरत दिघोळे आणि जिल्हाध्यक्ष भदाणे हे संतप्त झाले या दोन्हीही नेत्यांनी नाफेडचे अधिकाऱ्यांना दुपारी दोन वाजेपर्यंत वाट बघून सहभाग न घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून धारेवर धरले मोठ्या प्रमाणावरती यावर पिंपळगाव आणि देवळा बाजार समितीमध्ये गोंधळ झाला पण नाफेड आणि एनसीएफचे अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे उत्तर या शेतकरी संघटनेच्या नेत्यांना दिले नाही
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV