
बीड, 08 जून (हिं.स.) : बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या आवारातच जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने एक मोठी धडक कारवाई केली. अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रांसाठी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागणारा वादग्रस्त पोलीस एसीबीच्या पथकाने रंगेहात बेड्या ठोकल्या. काही महिन्यांपूर्वी एका तरुणाला 'तुझे कॅरॅक्टर खराब करीन' अशी उघड धमकी देणारा हा पोलीस स्वतःच लाचखोरीच्या चिखलात अडकल्याने बीड जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षकच जेव्हा अशा प्रकारे सामान्य नागरिकांची अडवणूक करून लाच मागतात, तेव्हा खाकी वर्दीच्या विश्वासार्हतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते.
काही दिवसांपूर्वी येळंबघाट परिसरात तक्रारदार यांच्या एका नातेवाइकाच्या वाहनाचा भीषण अपघात झाला होता. या अपघाताचा कायदेशीर विमा मिळवण्यासाठी आवश्यक असलेली शासकीय कागदपत्रे आणि पंचनामा देण्यासाठी अंमलदार याने १० हजार रुपयांची मागणी केली होती. शासकीय कर्तव्य बजावण्यासाठी चक्क लाचेची मागणी होत असल्याने संतप्त झालेल्या तक्रारदाराने थेट जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली.
तक्रार मिळताच एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने नेकनूर पोलीस ठाण्याच्या परिसरात अत्यंत गुप्तपणे सापळा रचला. ठरलेल्या नियोजनानुसार, तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाचेची रोकड स्वीकारत असताना दबा धरून बसलेल्या पथकाने अंमलदार याला जाळ्यात ओढले आणि पोलीस ठाण्याच्या आवारातच त्याला रंगेहात अटक केली.
-----------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis