
सैंटो डोमिंगो, 08 जून (हिं.स.)। डोमिनिकन रिपब्लिकमधील ला रोमाना आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक खासगी विमान कोसळल्याची गंभीर घटना घडली आहे. अमेरिकेत नोंदणीकृत असलेले हे बिझनेस जेट रविवारी आपत्कालीन लँडिंग करत असताना अपघातग्रस्त झाले. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये विमान धावपट्टीवर आदळल्यानंतर आगीच्या मोठ्या गोळ्यात रूपांतरित झाल्याचे दिसून येत आहे. या दुर्घटनेत विमानातील दोन्ही चालक दल सदस्यांचा मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींनी सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामध्ये विमान आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न करताना दिसत आहे. अपघातापूर्वी विमान भरधाव वेगाने धावपट्टीवर घासत जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर ते धावपट्टीवरून घसरून विमानतळ परिसरातील गवताळ भागात गेले आणि त्याचवेळी भीषण आग लागली.
डोमिनिकन नागरी विमान वाहतूक संस्था (आयडीएसी ) ने या घटनेची पुष्टी केली आहे. संस्थेच्या माहितीनुसार, विमानात केवळ वैमानिक आणि सहवैमानिक हेच दोन जण होते. अपघाताच्या वेळी विमानात कोणताही प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
विमानाच्या मॉडेलबाबत माहिती देताना आयडीएसीने सांगितले की, हे दोन इंजिन असलेले गल्फस्ट्रीम G200 बिझनेस जेट होते. अमेरिकेत नोंदणी झाल्यानंतर या विमानाला N318JF हा नोंदणी क्रमांक देण्यात आला होता.
माध्यमांच्या वृत्तानुसार, अपघातापूर्वी हे विमान ला रोमाना येथून उड्डाण केले होते. ला रोमाना हे डोमिनिकन रिपब्लिकची राजधानी सॅंटो डोमिंगोपासून सुमारे 130 किलोमीटर पूर्वेला असलेले एक लोकप्रिय पर्यटन शहर आहे. हे विमान अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ऑस्टिन शहराकडे जात होते.
उड्डाणानंतर काही वेळातच विमानात गंभीर बिघाड झाल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. विमानचालन अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, अपघातापूर्वी चालक दलाने आपत्कालीन स्थितीची माहिती नियंत्रण कक्षाला दिली होती. विमानात गंभीर यांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही सूचना देण्यात आली होती.
त्या वेळी विमान ला रोमाना येथून सुमारे 16 सागरी मैल दक्षिण-पश्चिम दिशेला होते. संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेऊन वैमानिकांनी विमान तातडीने जवळच्या विमानतळावर परत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपत्कालीन लँडिंग करत असतानाच विमान कोसळले आणि त्यानंतर भीषण आग लागली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode