
चेन्नई, 08 जून (हिं.स.)'नॉर्वे चेस २०२६' स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदचा तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी सत्कार केला. 'स्पोर्ट्स डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ तमिळनाडू'तर्फे त्यांना ५० लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. चेन्नई येथील मुख्य सचिवालयात हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या २० वर्षीय ग्रँडमास्टरसोबत बुद्धिबळाचा एक सामनाही खेळला. प्रज्ञानंद प्रतिष्ठित 'नॉर्वे चेस' विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय बुद्धिबळपचू ठरला आहे.
ओस्लो येथे झालेल्या 'नॉर्वे चेस २०२६' स्पर्धेच्या दहाव्या आणि अंतिम फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरचा पराभव करून प्रज्ञानंदने ऐतिहासिक विजय मिळवला. त्याने सलग चार 'क्लासिकल' विजय मिळवून आपल्या कारकिर्दीतील एक अत्यंत महत्त्वाचे विजेतेपद आपल्या नावे केले.
मुख्यमंत्री विजय यांची भेट घेतल्यानंतर प्रज्ञानंद यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, मला बुद्धिबळाचा पट (बोर्ड) सोबत आणण्यास सांगण्यात आले होते आणि मी मुख्यमंत्र्यांसोबत एक सामना खेळलो. ते माझ्यासोबत प्रत्यक्ष बुद्धिबळ खेळतील, अशी मला कधीच अपेक्षा नव्हती. आम्ही सुमारे १५ मिनिटे खेळलो आणि तो सामना मी जिंकलो. त्यांनी मला खूप पाठिंबा दिला आणि प्रोत्साहन दिले.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला मॅग्नस कार्लसन, विद्यमान जागतिक विजेता डोम्माराजू गुकेश, अलीरेझा फिरुझा, वेस्ली सो आणि व्हिन्सेंट कीमर यांसारख्या दिग्गज बुद्धिबळपटूंच्या स्पर्धेत चेन्नईच्या या ग्रँडमास्टरने बाजी मारली. अमेरिकन ग्रँडमास्टर वेस्ली सो याने अंतिम फेरीत 'आर्मागेडन' सामन्यात फिरुझाचा पराभव करून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. तर कार्लसनने गुकेशचा पराभव करून आणि चौथे स्थान मिळवून या आव्हानात्मक स्पर्धेचा सकारात्मक शेवट केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे