भारताने एका वर्षात वाढवला अण्वस्त्रांचा साठा; पाकिस्तानला टाकले मागे
- भारताकडे अणुबॉम्बची संख्या 180 वरून 190 झाली, तर पाकिस्तान 170 वॉरहेड्सवरच स्थिर नवी दिल्ली, 08 जून (हिं.स.)। भारताने गेल्या वर्षाच्या तुलनेत आपल्या अण्वस्त्रांच्या साठ्यात वाढ केली आहे. भारताकडे असलेल्या अणुबॉम्बची संख्या 180 वरून यावर्षी 190 झ
SIPRI Annual Year Book India Nuclear Power


- भारताकडे अणुबॉम्बची संख्या 180 वरून 190 झाली, तर पाकिस्तान 170 वॉरहेड्सवरच स्थिर

नवी दिल्ली, 08 जून (हिं.स.)। भारताने गेल्या वर्षाच्या तुलनेत आपल्या अण्वस्त्रांच्या साठ्यात वाढ केली आहे. भारताकडे असलेल्या अणुबॉम्बची संख्या 180 वरून यावर्षी 190 झाली आहे, तर शेजारील पाकिस्तानची अणुक्षमता कोणताही बदल न होता 170 वॉरहेड्सवरच स्थिर राहिली आहे. त्यामुळे अण्वस्त्रांच्या बाबतीत भारताने पाकिस्तानवर रणनीतिक आघाडी मिळवली आहे. सध्या जगातील नऊ देशांकडे एकूण 12,187 अण्वस्त्रे आहेत. त्यापैकी सुमारे 9,745 वॉरहेड्स संभाव्य वापरासाठी लष्करी साठ्यात पूर्णतः सज्ज अवस्थेत ठेवण्यात आले आहेत. यांपैकी सुमारे 4,012 वॉरहेड्स क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांवर सक्रियपणे तैनात करण्यात आले आहेत.

संरक्षण क्षेत्रावर लक्ष ठेवणाऱ्या जागतिक संस्थेने, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (सिप्री) ने आपले वार्षिक इयरबुक प्रकाशित केले आहे. जगभरात युद्धाच्या बदलत्या पद्धती आणि सैन्याच्या आधुनिकीकरणामुळे शस्त्रसाठा वाढविण्याची स्पर्धा तीव्र झाली आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र हस्तांतरण अहवालात नमूद करण्यात आले आहे की, अण्वस्त्रांची संख्या आणि त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी अनेक दशकांपासून सुरू असलेले आंतरराष्ट्रीय प्रयत्न आता उलट दिशेने जात असल्याचे दिसत आहे. अण्वस्त्रांच्या शर्यतीत रशिया आणि अमेरिका आजही आघाडीवर आहेत.

अहवालानुसार, अण्वस्त्रसज्ज नऊ देशांकडे यावर्षी जानेवारीपर्यंत एकूण 12,187 अणुबॉम्ब होते, तर 2025 मध्ये ही संख्या 12,241 होती. वरवर पाहता अणुबॉम्बच्या एकूण संख्येत किंचित घट झाल्याचे दिसत असले, तरी तज्ज्ञांच्या मते हे चित्र दिशाभूल करणारे आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, जगभरात सुमारे 2,100 ते 2,200 अण्वस्त्र वॉरहेड्स ‘हाय ऑपरेशनल अलर्ट’वर ठेवण्यात आले आहेत. म्हणजेच, आदेश मिळाल्यानंतर काही मिनिटांतच त्यांचा वापर करता येऊ शकतो. या श्रेणीत सर्वाधिक अण्वस्त्रे रशिया आणि अमेरिकेकडे आहेत.

अण्वस्त्रांच्या बाबतीत रशिया सध्या जगातील सर्वात मोठी अणुशक्ती म्हणून कायम आहे. त्याच्याकडे एकूण 5,420 वॉरहेड्स आहेत. या यादीत अमेरिका 5,042 वॉरहेड्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा शेजारी देश चीनही वेगाने आपला अण्वस्त्रसाठा वाढवत असून त्याच्याकडे असलेल्या अणुबॉम्बची संख्या 600 वरून 620 झाली आहे.

सिप्रीच्या या वार्षिक अहवालात फ्रान्सने सर्वाधिक आश्चर्यचकित केले आहे. कारण एका वर्षात फ्रान्सच्या अणुबॉम्बच्या संख्येत 80 ने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 290 वॉरहेड्स असलेला फ्रान्स यावर्षी थेट 370 वॉरहेड्सपर्यंत पोहोचला आहे.

याउलट, युनायटेड किंग्डम (यूके) ने आपली रणनीतिक क्षमता स्थिर ठेवली असून त्याच्याकडे सध्या 225 वॉरहेड्स आहेत. पश्चिम आशियात इराणसोबत संघर्ष सुरू असतानाही इस्रायलने आपला अण्वस्त्रसाठा वाढवलेला नाही आणि त्याच्याकडे गेल्या वर्षाप्रमाणेच 90 वॉरहेड्स आहेत. उत्तर कोरियाही सातत्याने घातक शस्त्रनिर्मिती करत असून त्याचा अण्वस्त्रसाठा 50 वरून 60 वॉरहेड्सपर्यंत वाढला आहे. या अहवालातून हे स्पष्ट होते की, जगातील अनेक देश पुन्हा एकदा अण्वस्त्रांवरील आपली अवलंबित्व वाढवत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande