
नवी दिल्ली , 08 जून (हिं.स.) । इस्रायल-इराण संघर्षामुळे पश्चिम आशियातील तणाव वाढत असताना एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. फॉरवर्ड सीमन्स युनियन ऑफ इंडिया (एफएसयूआय) ने रविवारी ओमानच्या किनारपट्टीजवळ कथित हल्ल्याला बळी पडलेल्या एका जहाजावरील 24 भारतीय खलाशांसाठी तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. युनियनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टद्वारे भारतीय अधिकारी आणि भारतीय नौदलाला त्वरित हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.
एफएसयूआय ने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ओमानच्या किनारपट्टीजवळ 20°57.07N, 59°08.13E या स्थानावर असलेल्या जहाजावरील 24 भारतीय खलाशांना तातडीने मदतीची गरज आहे.” मात्र, हल्ल्याचे स्वरूप, जहाजाचे नाव किंवा खलाशांची सध्याची स्थिती याबाबत युनियनने कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही. या घटनेची अद्याप भारतीय नौदल, परराष्ट्र मंत्रालय (MEA) किंवा इतर कोणत्याही सरकारी यंत्रणेकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, हे जहाज होर्मुझ सामुद्रधुनीजवळ होते.
होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील तेलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची सागरी मार्गिका मानली जाते. जागतिक ऊर्जा पुरवठ्यातील मोठा हिस्सा या मार्गातून वाहून नेला जातो. इस्रायल आणि इराण यांच्यातील अलीकडील संघर्षानंतर संपूर्ण प्रदेशातील सागरी सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. व्यापारी जहाजांवरील संभाव्य हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखरेख आणि सुरक्षा उपाय अधिक कडक करण्यात आले आहेत.
एफएसयूआय च्या आवाहनानंतर भारतीय समुदायासह खलाशांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय नौदल या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, संबंधित खलाशांची सध्याची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. पुढील अधिकृत माहिती समोर आल्यानंतर परिस्थिती अधिक स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode