कच्च्या तेलाच्या दरवाढीचा शेअर बाजाराला फटका; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद
नवी दिल्ली, 08 जून (हिं.स.)। पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीचा थेट परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर दिसून आला. आठवड्याच्या पहिल्याच व्यवहार दिवशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केल्याने सेन्सेक्स
Stock Market Closing


नवी दिल्ली, 08 जून (हिं.स.)। पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीचा थेट परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर दिसून आला. आठवड्याच्या पहिल्याच व्यवहार दिवशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये लक्षणीय घसरण झाली. दिवसाच्या सुरुवातीलाच बाजार कमकुवत पातळीवर उघडला होता. पहिल्या सत्रात काही प्रमाणात खरेदी वाढल्याने बाजाराने सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र दुपारी एकच्या सुमारास पुन्हा विक्रीचा दबाव वाढल्याने घसरण तीव्र झाली. अखेरीस सेन्सेक्स ०.९७ टक्के आणि निफ्टी १.०४ टक्क्यांच्या तोट्यासह बंद झाले.

दिवसभर जवळपास सर्वच क्षेत्रांतील समभागांवर दबाव राहिला. धातू आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातील समभागांमध्ये सर्वाधिक विक्री झाली. त्यामुळे धातू निर्देशांक २.४३ टक्क्यांनी, तर स्थावर मालमत्ता निर्देशांक २.०१ टक्क्यांनी घसरला. याशिवाय बँकिंग, माहिती तंत्रज्ञान, वाहननिर्मिती, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, दैनंदिन उपभोग्य वस्तू, आरोग्यसेवा, तेल व वायू, सार्वजनिक क्षेत्र आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील निर्देशांकही घसरणीसह बंद झाले. व्यापक बाजारातही विक्रीचे वातावरण राहिल्याने मध्यम भांडवल निर्देशांक १.४० टक्क्यांनी, तर लघु भांडवल निर्देशांक १.९२ टक्क्यांनी खाली आला.

या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ६.०१ लाख कोटी रुपयांची घट झाली. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ४६१.१० लाख कोटी रुपयांवरून ४५५.०९ लाख कोटी रुपयांवर आले.

सेन्सेक्स ८२१.७३ अंकांच्या घसरणीसह ७३,४२१.६१ अंकांवर उघडला. व्यवहारादरम्यान तो ७३,३१८.९४ अंकांपर्यंत घसरला होता. नंतर खरेदी वाढल्याने तो ७३,९३४.३५ अंकांपर्यंत सावरला; मात्र शेवटच्या टप्प्यातील विक्रीमुळे ७१९.०८ अंकांनी घसरून ७३,५२४.२६ अंकांवर बंद झाला. निफ्टीनेही २८६ अंकांच्या घसरणीसह २३,०८०.७० अंकांवर सुरुवात केली. दिवसात तो २३,२६७.३० अंकांपर्यंत पोहोचला होता, परंतु अखेरीस २४३.७० अंकांच्या घसरणीसह २३,१२३ अंकांवर स्थिरावला.

दिवसअखेर मॅक्स हेल्थकेअर, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, टेक महिंद्रा, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि नेस्ले या समभागांनी वाढ नोंदवली. दुसरीकडे विप्रो, जिओ फायनान्शियल, एटरनल, श्रीराम फायनान्स आणि हिंदाल्को इंडस्ट्रीज हे समभाग सर्वाधिक घसरणीतील प्रमुख समभाग ठरले. बाजारातील एकूण चित्र पाहता गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण कायम असल्याचे स्पष्ट झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande