
तृणमूल काँग्रेसमध्ये बंडखोरीमुळे संकट गहिरे
नवी दिल्ली, 08 जून (हिं.स.)। तृणमूल काँग्रेस (टीएमसी)मध्ये राजकीय संकट अधिक गहिरे झाले आहे. सोमवारी पक्षाच्या बंडखोर खासदार डॉ. काकोली घोष दस्तीदार यांनी दावा केला की, किमान २० खासदारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून याबाबत त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना माहिती दिली आहे.
पश्चिम बंगालमधील बारासात लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. काकोली घोष दस्तीदार यांनी सांगितले की, २० खासदारांच्या वतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना आधीच पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रात केंद्रातील सत्ताधारी एनडीए सरकारला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे.
डॉ. काकोली घोष दस्तीदार म्हणाल्या की, २० तृणमूल काँग्रेस खासदारांनी विद्यमान एनडीए सरकारला पाठिंबा देण्याच्या निर्णयाची माहिती लोकसभा अध्यक्षांना पत्राद्वारे दिली आहे. त्या म्हणाल्या की, त्या लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या मुख्य प्रतोद (चीफ व्हिप) आहेत आणि हा निर्णय इतर खासदारांशी चर्चा करून घेण्यात आला आहे.
घोष दस्तीदार यांनी सांगितले की, त्यांना टीएमसीच्या मुख्य प्रतोद पदावरून हटविण्याचा निर्णय मनमानी आणि एकतर्फी होता. पक्षाध्यक्षांनी त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती जाहीर केली असली तरी त्यामुळे घटनात्मक आणि संसदीय स्थिती एका रात्रीत बदलत नाही. आम्ही जनतेच्या कौल स्वीकारला आहे आणि त्याचा आदर करतो आणि भविष्यात आमची राजकीय दिशा एनडीएसोबत असावी, असे आम्हाला वाटते. सध्या संसदेत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनंतर तृणमूल काँग्रेस हा तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये टीएमसीचे एकूण ४० खासदार आहेत. त्यापैकी लोकसभेत २८ तर राज्यसभेत १२ सदस्य आहेत.
सुखेंदू शेखर रॉय यांनी सोमवारी तृणमूल काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बंडखोर खासदारांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचीही भेट घेतल्याचे सांगितले जाते. या बंडखोर खासदारांमध्ये बापी हलदार (मथुरापूर), जून मालिया (मेदिनीपूर), जगदीश बसुनिया (कूचबिहार), कालीपदा सोरेन (झारग्राम), अरूप चक्रवर्ती (बांकुडा), पार्थ भौमिक (बैरकपूर), शर्मिला सरकार (बर्धमान पूर्व), डॉ. काकोली घोष दस्तीदार (बारासात), प्रसून बॅनर्जी (हावडा), शताब्दी रॉय (बीरभूम) आणि असीत माल (बोलपूर) यांचा समावेश आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील अंतर्गत संकट सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा घटनाक्रम समोर आला आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतही टीएमसीच्या ८० आमदारांपैकी ५८ आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा अध्यक्षांनी या आमदारांसाठी सभागृहात स्वतंत्र बसण्याची व्यवस्था केल्याची माहिती आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule