
मृतांमध्ये गुजरातच्या 5 जणांचा समावेश
अमळनेर, 09 जून (हिं.स.) : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावाजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात गुजरातमधील एका कुटुंबातील 5 जणांसह स्थानिक दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. कार, दुचाकी आणि राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये झालेल्या जोरदार धडकेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील व्यारा येथील एक कुटुंब अमळनेर येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी कारने येत होते. मंगरूळ गावाजवळ भरधाव वेगातील कार, दुचाकी आणि एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की कारमधील प्रवासी वाहनातच अडकून पडले.धडकेचा प्रचंड आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी धावून आले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. विशेषतः कारमधील एका लहान मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी अथक प्रयत्न केले.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवी पाटील तसेच मंगरूळचे पोलीस पाटील भागवत पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वाहतूक नियंत्रणासह बचावकार्याला गती दिली. १०८ रुग्णवाहिकांच्या सहाय्याने जखमींना त्वरित उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात एसटी बसमधील दीपक दिलीप पाटील हे प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे प्रयत्न करून वाहतूक सुरळीत केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून मृतांची ओळख पटविण्याची प्रक्रिया बराच वेळ सुरू होती.
दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली असून गुजरातमधून त्यांचे कुटुंबीय अमळनेरकडे रवाना झाले आहेत. साखरपुड्याच्या आनंदोत्सवासाठी निघालेल्या कुटुंबावर आलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे व्यारा आणि अमळनेर परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. वाहनांचा वेग, रस्त्यावरील परिस्थिती तसेच अपघाताच्या वेळी घडलेला घटनाक्रम याचा तपशील तपासला जात आहे.या भीषण अपघाताने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षित वाहनचालना आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित केली आहे.
---------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी