
लातूर, 09 जून (हिं.स.) : तब्बल 20 वर्षांपासून फरार असलेल्या आर्म ॲक्टमधील आरोपीस लातूर पोलसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने परजिल्ह्यातून शोधून काढत अटक केली आहे.
पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे सन 2006 मध्ये भारतीय हत्यार कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी सिद्धेश्वर ऊर्फ सिद्राम ऊर्फ पिंटू वसंत मुळे (वय 41, रा. डाळींब, ता. उमरगा, जि. धाराशिव) हा गेल्या दोन दशकांपासून फरार होता. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही तो सातत्याने आपली ओळख, वास्तव्य व हालचाली बदलत पोलिसांना चकवा देत होता.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी उमरगा परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी हनुमान मंदिर, डाळींब परिसरात सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.
पोलिसांनी मिरा हॉटेल परिसरात 10 जुलै 2006 रोजी दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी आरोपीकडून गावठी पिस्तूल (कट्टा), जिवंत काडतूस तसेच शस्त्रनिर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आरोपी सतत फरार होता.
दरम्यान, दुसरा आरोपी देविदास रघुनाथ पांचाळ ऊर्फ सुतार याचा मृत्यू झाल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली असून त्याबाबत अधिकृत कागदपत्रे प्राप्त करण्यात आली आहेत.
दीर्घ तपास, गुप्त माहितीचे संकलन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून अखेर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. अटक केलेल्या आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis