राजकोटहुन दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला पक्षी धडकल्याने विमानाचे आपत्कालीन लँडिंग
गांधीनगर , 09 जून (हिं.स.)राजकोटच्या हिरासर (राजकोट आंतरराष्ट्रीय) विमानतळावर आज एक मोठी विमान दुर्घटना थोडक्यात टळली. राजकोटहून दिल्लीकडे जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाण घेत असताना पक्ष्याला धडकले. पक्षी धडकल्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान राखत ता
राजकोटहुन दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला     पक्षी धडकल्याने विमानाचे आपत्कालीन लँडिंग


गांधीनगर , 09 जून (हिं.स.)राजकोटच्या हिरासर (राजकोट आंतरराष्ट्रीय) विमानतळावर आज एक मोठी विमान दुर्घटना थोडक्यात टळली. राजकोटहून दिल्लीकडे जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाण घेत असताना पक्ष्याला धडकले. पक्षी धडकल्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान राखत तात्काळ विमानतळावरच सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केली. या विमानात 124 प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून विमानतळ प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे हे विमान राजकोट विमानतळावरील धावपट्टीवरून उड्डाण घेत असताना अचानक एका पक्ष्याची विमानाच्या इंजिनला धडक बसली. या धडकेमुळे विमानाच्या इंजिनमधील प्रोपेलर (ब्लेड) मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्याचे सांगितले जात आहे. इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता लक्षात घेऊन वैमानिकाने तत्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क साधला आणि विमान पुन्हा धावपट्टीवर आणून सुरक्षितरीत्या उतरवले.

या गंभीर घटनेनंतर नागरी विमान वाहतूक नियामक यंत्रणा सतर्क झाली आहे. संबंधित एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनच्या तांत्रिक दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) ची विशेष टीम विमानाची सखोल तपासणी आणि तांत्रिक चाचणी करणार आहे.

डीजीसीए च्या नियमांनुसार अशा घटनेनंतर विमानाची ‘इन्स्पेक्शन ट्रायल’ (चाचणी उड्डाण) घेतली जाते. सर्व सुरक्षा निकषांची पूर्तता झाल्यानंतर आणि अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतरच विमानाला पुन्हा प्रवाशांसह उड्डाण करण्याची परवानगी दिली जाईल. दरम्यान, विमानतळ प्रशासनाकडून प्रवाशांसाठी पर्यायी प्रवास व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande