जळगाव कारागृहात कैद्याचा पोलिसावर हल्ला
जळगाव , 09 जून (हिं.स.) | जिल्हा कारागृहातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाहेर थांबण्याची वेळ संपल्याने बॅरेकमध्ये जाण्यास सांगितल्याच्या रागातून या कैद्याने रक्षकाची कॉलर पकडून त्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात पोलिस रक्षकाच्या गणवेशाची
जळगाव कारागृहात कैद्याचा पोलिसावर हल्ला


जळगाव , 09 जून (हिं.स.) | जिल्हा कारागृहातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाहेर थांबण्याची वेळ संपल्याने बॅरेकमध्ये जाण्यास सांगितल्याच्या रागातून या कैद्याने रक्षकाची कॉलर पकडून त्यांना बेदम मारहाण केली.

या हल्ल्यात पोलिस रक्षकाच्या गणवेशाची बटने तुटली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात कैद्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशिनाथ कारभारी मोटे (वय २६, रा. शिव कॉलनी, जळगाव) हे जळगाव जिल्हा कारागृहात रक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. कारागृहातील सर्कल क्रमांक ३ मध्ये ड्युटी होती. सकाळी ११ ते सव्वा अकरा वाजेच्या सुमारास बंदीवानांची बाहेर राहण्याची वेळ संपल्याने सर्व कैद्यांना आपापल्या बॅरेकमध्ये जाण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. याच वेळी, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेला आरोपी कैदी सुनील यशवंत नन्नवरे हा सर्कल क्रमांक ३ मध्ये विनाकारण रेंगाळताना आढळून आला. रक्षक काशिनाथ मोटे यांनी त्याला त्याच्या हक्काच्या सर्कल क्र. १ मधील बॅरेक क्र. ३ मध्ये जाण्यास सांगितले. मात्र, याचा सुनील नन्नवरे याला तीव्र राग आला. बॅरेकमध्ये जाण्याच्या कारणावरून कैदी सुनील नन्नवरे याने रक्षक मोटे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

हा वाद इतका वाढला की, संतापलेल्या कैद्याने थेट रक्षक मोटे यांच्या शर्टची कॉलर पकडली आणि त्यांना चापट-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या अचानक झालेल्या हल्ल्यात पोलीस रक्षक मोटे यांच्या खाकी गणवेशाची दोन बटणेही तुटली.या अनपेक्षित प्रकारामुळे कारागृह परिसरात काही काळ प्रचंड गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ तुरुंग अधीक्षकांच्या आदेशानुसार आरोपी कैदी सुनील नन्नवरे याला तातडीने दुसऱ्या एका विभक्त (आयसोलेशन) बॅरेकमध्ये हलवण्यात आले आहे. याप्रकरणी जखमी पोलीस रक्षक काशिनाथ मोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कैद्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande