जमिनीच्या वादातून कर्जतमध्ये मारहाण; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
रायगड, 09 जून (हिं.स.) : जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून कर्जत तालुक्यातील पोटलवाडी येथे झालेल्या हाणामारीप्रकरणी आठ जणांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच गावातील
Beating in Karjat over land dispute; Case registered against eight people


रायगड, 09 जून (हिं.स.) : जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून कर्जत तालुक्यातील पोटलवाडी येथे झालेल्या हाणामारीप्रकरणी आठ जणांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच गावातील असून त्यांच्यात जागा-मिळकतीच्या कारणावरून पूर्वीपासून वाद सुरू आहे. फिर्यादी यांच्या वडिलांच्या मालकीची सर्व्हे क्रमांक ४७/३ मधील ५६ गुंठे क्षेत्राची जमीन असून त्या ठिकाणी नवीन सिमेंट कंपाऊंड वॉल उभारण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, आरोपी घटनास्थळी येऊन काम थांबविण्याची मागणी करत संबंधित जमीन त्यांच्या आजोबांची असल्याचा दावा केला. यावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. आरोपींपैकी एकाने लोखंडी रॉडने तर दुसऱ्याने फावड्याच्या दांडक्याने फिर्यादी व साक्षीदारांना मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच घर पाडण्याची, गावात राहू न देण्याची आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील विविध कलमान्वये आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande