जीवन विमा तक्रारींमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट; ग्राहकांचा वाढला विश्वास
मुंबई, 09 जून, (हिं.स.)। भारतातील जीवन विमा क्षेत्रात ग्राहकांच्या अनुभवामध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे ''आयआरडीएआय'' विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्याआर्थिक वर्ष २०२४ च्या वार्षिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. विमा व्यवसायाचा वेगाने विस्तार होत
Drop Life Insurance Complaints Customer Confidence Grows


मुंबई, 09 जून, (हिं.स.)। भारतातील जीवन विमा क्षेत्रात ग्राहकांच्या अनुभवामध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे 'आयआरडीएआय' विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्याआर्थिक वर्ष २०२४ च्या वार्षिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. विमा व्यवसायाचा वेगाने विस्तार होत असतानाच ग्राहकांच्या तक्रारींमध्ये मोठी घट झाल्याने या क्षेत्रावरील लोकांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे दिसून येत आहे.

अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये चालू पॉलिसींची संख्या २ कोटी ९२ लाखांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच विम्याचा विस्तार वेगाने होत असतानाच, दुसरीकडे गेल्या १० वर्षांत तक्रारींची संख्या २.७९ लाखांवरून थेट १.२३ लाखांपर्यंत खाली आली आहे असून, दशकभरात तक्रारींमध्ये ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.

दर १० हजार पॉलिसींमागे होणाऱ्या तक्रारींचे प्रमाणही १०८ वरून थेट ४२ वर आले आहे. तसेच तक्रारींचे गुणोत्तर १.०८ टक्क्यांवरून घटून ०.४२ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ‘विमा भरोसा’ संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी १ टक्क्यांपेक्षाही कमी तक्रारी प्रलंबित राहिल्या.

डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर, ई-केवायसी, आधार पडताळणी, तत्काळ सत्यापन व्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने करण्यात येणारी देखरेख यामुळे विमा विक्रीची गुणवत्ता सुधारली असून वादांचे प्रमाण कमी झाले आहे. पॉलिसीधारकांच्या हितासाठी लागू करण्यात आलेल्या नव्या नियमांमुळे दावा निकाली काढण्याची मुदत ३० दिवसांवरून १५ दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे, तर तपासणीची मुदत ९० दिवसांवरून ४५ दिवसांपर्यंत आणली आहे.

देशाच्या एकूण विमा व्यवसायात जीवन विम्याचा वाटा ८० टक्क्यांहून अधिक असून या क्षेत्राने सरकारी रोख्यांमध्ये २४.३७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आर्थिक स्थैर्य आणि पायाभूत सुविधांच्या विकासातही जीवन विमा क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे. ‘२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा’ हे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्राहककेंद्रित सेवा, जलद कार्यपद्धती आणि पारदर्शक व्यवस्थेवर विशेष भर दिला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande