
जळगाव, 09 जून (हिं.स.) : गेल्या काही काळापासून सातत्याने उच्चांक गाठणाऱ्या सराफा बाजारात आता सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव सराफा बाजारात खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला असून सोनं आणि चांदी दोन्हीही लक्षणीय स्वस्त झाले आहेत.
मागील 24 तासांत जळगावमध्ये सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे तब्बल 1,545 रुपयांची घसरण झाली असून दर 1,55,015 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहेत. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही मोठी घसरण होत ती 7,210 रुपयांनी कमी होऊन 2,52,350 रुपये प्रति किलोवर स्थिरावली आहे.
केवळ एका दिवसातच नव्हे, तर संपूर्ण आठवडाभरातही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट नोंदवली गेली आहे. आठवड्याभरात सोनं 4,841 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 21,630 रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे.
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्या-चांदीच्या दरांवर दबाव निर्माण झाला आहे. सामान्यतः महागाई आणि राजकीय अनिश्चिततेच्या काळात सोने सुरक्षित गुंतवणूक मानले जाते, त्यामुळे दर वाढतात. मात्र यावेळी जागतिक बाजारातील ट्रेंड उलट दिशेने गेल्याचे दिसून येत आहे.
पश्चिम आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता असूनही अमेरिकन डॉलरची ताकद आणि व्याजदरांशी संबंधित स्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीवर दबाव निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुढील काही काळातही दरांमध्ये चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर