
- प्रति शेअर ३०३ रुपये फ्लोअर प्राइस
नवी दिल्ली, 09 जून (हिं.स.)। केंद्र सरकारने मंगळवारी आपल्या नवरत्न कंपनी एनएलसी इंडिया लिमिटेडमधील तीन टक्के हिस्सेदारी ‘ऑफर फॉर सेल’ (ओएफएस) माध्यमातून विकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी प्रति शेअर ३०३ रुपये फ्लोअर प्राइस निश्चित करण्यात आला आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, ही विक्री ऑफर (ओएफएस) आज बिगर-किरकोळ (नॉन-रिटेल) गुंतवणूकदारांसाठी खुली करण्यात आली असून, किरकोळ (रिटेल) गुंतवणूकदारांसाठी ती बुधवारी उपलब्ध होणार आहे. एनएलसी इंडिया लिमिटेडचे शेअर्स ३०३ रुपये प्रति शेअर या दराने विकले जाणार आहेत. हा दर सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) वर बंद झालेल्या ३३५.६५ रुपये प्रति शेअर या भावापेक्षा ९.७३ टक्के कमी आहे.
गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (दीपम) सचिव अरुणीश चावला यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारत सरकार एनएलसी इंडिया लिमिटेडमधील मूळतः दोन टक्के हिस्सा ‘ऑफर फॉर सेल’च्या माध्यमातून विकण्याची घोषणा करत आहे.
दीपम सचिवांनी सांगितले की, अपेक्षेपेक्षा जास्त बोली मिळाल्यास अतिरिक्त एक टक्का हिस्सा विकण्यासाठी ‘ग्रीन शू’ पर्यायही राखून ठेवण्यात आला आहे. चावला म्हणाले की, मजबूत परिचालन आणि आर्थिक कामगिरी, सातत्यपूर्ण परतावा आणि आकर्षक लाभांश यामुळे एनएलसी इंडिया दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक आकर्षक संधी उपलब्ध करून देते.
केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये आतापर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील अल्पांश हिस्सेदारी विकून १२,१६६ कोटी रुपये उभारले आहेत. यामध्ये कोल इंडिया मधून ५,५४२ कोटी रुपये, एनएचपीसी मधून ४,३५७ कोटी रुपये आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधून २.२७ कोटी रुपये उभारण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule