
नवी दिल्ली, 09 जून, (हिं.स.)। खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने सीमांत खर्चावर आधारित कर्जदर (एमसीएलआर) मध्ये ०.१० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. दोन वर्षांच्या कालावधीच्या कर्जासाठी हा दर आता ८.४५ टक्क्यांवरून ८.५५ टक्के झाला आहे. नवीन दर ८ जूनपासून लागू झाले आहेत.
बँकेने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकेच्या या निर्णयाचा थेट परिणाम अशा कर्जदारांच्या ईएमआयवर होणार आहे, ज्यांची कर्जे एमसीएलआर प्रणालीशी जोडलेली आहेत. त्याचप्रमाणे वाहन, गृह आणि वैयक्तिक कर्जांसारख्या बहुतांश ग्राहक कर्जांसाठी मानक मानला जाणारा एक वर्षाचा एमसीएलआर दर ०.०५ टक्क्यांनी वाढून आता ८.४० टक्के झाला आहे. याशिवाय २४ तास, तीन महिने, सहा महिने आणि तीन वर्षांच्या कालावधीच्या कर्जदरांमध्येही ०.०५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
एमसीएलआर म्हणजे काय?
एमसीएलआर हा तो आधारभूत दर असतो, ज्याच्या आधारे बँका त्यांच्या बहुतांश कर्जांवरील व्याजदर निश्चित करतात. या निर्णयाचा परिणाम ग्राहकांच्या गृहकर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तिक कर्जांच्या मासिक हप्त्यांवर (ईएमआय) होऊ शकतो. एचडीएफसी बँकेचा हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा धोरणात्मक रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. सध्या रेपो दर ५.२५ टक्क्यांवर स्थिर आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule