जळगावात क्षुल्लक वादातून वृद्धाची दगडाने ठेचून हत्या
जळगाव, 09 जून (हिं.स.)| शहरातील शामनगर परिसरात क्षुल्लक वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ६४ वर्षीय वृद्धाची दगडाने डोके ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. जीवन शालीक पाथकर ऊर्फ जीवन मिस्तरी (वय ६४, मूळ रह
हत्या लोगो


जळगाव, 09 जून (हिं.स.)| शहरातील शामनगर परिसरात क्षुल्लक वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ६४ वर्षीय वृद्धाची दगडाने डोके ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. जीवन शालीक पाथकर ऊर्फ जीवन मिस्तरी (वय ६४, मूळ रहिवासी – रोटवद, ता. जामनेर) असे या दुर्दैवी मृत वृद्धाचे नाव आहे.

याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवन मिस्तरी हे गेल्या १५ वर्षांपासून जळगावात राहत होते. आईच्या निधनानंतर पत्नीने त्यांची साथ सोडली होती, तर मुलानेही वेगळा संसार थाटल्यामुळे ते अत्यंत एकाकी जीवन जगत होते. शहरात कचरा वेचून आणि मिळेल ते काम करून ते स्वतःची गुजराण करत असत. शामनगर परिसरातील रेल्वे पुलाजवळ एक रक्ताळलेल्या अवस्थेतील अनोळखी मृतदेह नागरिकांना आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी जितेंद्र राजपूत आणि अजित पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.

दरम्यान, मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असतानाच, मयताचा भाचा तुषार राजेंद्र सुतार याला या घटनेची माहिती मिळाली. त्याने जिल्हा रुग्णालयात जाऊन मृतदेह पाहिला असता, तो त्याच्या मामाचा म्हणजेच जीवन पाथकर यांचा असल्याचे स्पष्ट झाले. तुषारने मामासोबत राहणाऱ्या अन्य दोघांवर संशय व्यक्त केला. प्राथमिक तपासात दोघांनी क्षुल्लक वादातून जीवन यांना बेदम मारहाण केली आणि ते खाली पडल्यावर त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची हत्या केल्याचे समोर आले. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या. या घटनेमुळे जळगाव शहरात तीव्र खळबळ उडाली असून फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande