जळगावमध्ये ड्रग्स प्रकरणातील आरोपीच्या अतिक्रमणावर बुलडोझर कारवाई
जळगाव, 09 जून (हिं.स.) : शहरात गाजत असलेल्या एमडी ड्रग्स प्रकरणातील अटकेत असलेल्या संशयित आरोपीच्या घरावरील अतिक्रमणावर महानगरपालिकेने बुलडोझर चालवत मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर शहरात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या भूमिकेची चर्चा सुरू आहे. एमडी
जळगावमध्ये ड्रग्स प्रकरणातील आरोपीच्या अतिक्रमणावर बुलडोझर कारवाई


जळगाव, 09 जून (हिं.स.) : शहरात गाजत असलेल्या एमडी ड्रग्स प्रकरणातील अटकेत असलेल्या संशयित आरोपीच्या घरावरील अतिक्रमणावर महानगरपालिकेने बुलडोझर चालवत मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर शहरात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या भूमिकेची चर्चा सुरू आहे.

एमडी ड्रग्स प्रकरणात एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी चार जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे, तर दोन संशयित अद्याप फरार आहेत.

अटकेत असलेल्या आरोपी रईस देशमुख याच्या सुप्रीम कॉलनी परिसरातील अतिक्रमित बांधकामावर महापालिका आणि एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. या मोहिमेत अतिक्रमणाखाली उभारण्यात आलेली दोन दुकाने जमीनदोस्त करण्यात आली.

कारवाईदरम्यान परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. सकाळपासून सुरू असलेल्या या कारवाईकडे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात लक्ष लागले होते.

महापालिकेचे उपायुक्त पंकज गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिसांकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर संबंधित बांधकामाची पडताळणी करून नियमानुसार ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणातील इतर आरोपींच्या मालमत्तांवरील अतिक्रमणांचीही तपासणी सुरू असून नियमबाह्य बांधकाम आढळल्यास पुढील कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande