
मनीला, 09 जून (हिं.स.)।फिलिपाइन्समधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले बेट मिंडानाओ येथे सोमवारी झालेल्या भीषण भूकंपाने मोठी हानी केली आहे. या भूकंपात आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 500 जण जखमी झाले आहेत. भूकंपानंतर उसळलेल्या प्रचंड समुद्री लाटांमुळे किनारपट्टीवरील अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
सध्या प्रभावित भागात बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मंगळवारी, म्हणजेच आपत्तीनंतरच्या दुसऱ्या दिवशी, बचाव पथके कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेताना दिसली. सरकारी आकडेवारीनुसार, अद्याप चार जण बेपत्ता आहेत.नागरी संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, गंभीर नुकसान झालेल्या इमारतींची सखोल तपासणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून जिवंत बचावलेले किंवा मृत व्यक्तींचा शोध घेता येईल. या भूकंपामुळे सरकारी इमारती, शाळा आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रभावित नागरिकांना तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये हलविण्यात आले आहे.
माहितीनुसार, समुद्रात सुमारे 1.4 मीटर (4.6 फूट) उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. सुनामीसदृश परिस्थितीमुळे किनाऱ्यालगतच्या अनेक कच्च्या घरांचे नुकसान झाले. या समुद्री लाटांचा परिणाम इंडोनेशिया, पलाऊ आणि दक्षिण जपानच्या किनाऱ्यांपर्यंत जाणवला. या आपत्तीचा मोठा फटका जनरल सॅंटोस या सात लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या किनारी शहरालाही बसला. ‘टुना कॅपिटल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात अनेक इमारती कोसळल्या असून येथे 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरी संरक्षण विभागाचे अधिकारी राफेलिटो अलेजांद्रो यांच्या मते, सरंगानी प्रांतात किमान 18 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी बहुतेक मृत्यू भूस्खलनामुळे झाले आहेत. याशिवाय साउथ कोटाबाटो, दावाओ ऑक्सिडेंटल आणि बालुट बेटावरही मृत्यूची नोंद झाली आहे. सरकारी माहितीनुसार, या आपत्तीत सुमारे 2,000 घरे आणि 117 सरकारी इमारती नुकसानग्रस्त झाल्या आहेत. तसेच जनरल सॅंटोस आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरता बंद ठेवण्यात आला असून त्यामुळे 63 देशांतर्गत उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार आर्थिक आणि भौतिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
उन्हाळी सुट्टीनंतर शाळांचा पहिला दिवस असतानाच हा भूकंप झाला. अधिकाऱ्यांनी नागरिकांना आफ्टरशॉक्सचा (भूकंपानंतरचे धक्के) इशारा दिला आहे. ज्या इमारतींना तडे गेले आहेत, त्या पुढील धक्क्यांमुळे कोसळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रभावित भागातील सुमारे 6,000 सरकारी शाळांच्या इमारतींची तपासणी करण्यात येणार असून त्यानंतरच वर्ग पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, फिलिपाइन्सला मदत करण्यासाठी अनेक देश पुढे सरसावले आहेत. अमेरिकेने मनीलासोबत समन्वय साधत मदतकार्यांसाठी तयार असल्याचे सांगितले आहे. तसेच फ्रान्स, जपान आणि न्यूझीलंड यांनीही फिलिपाइन्सला आवश्यक ती मदत देण्याची तयारी दर्शवली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode