पीओकेमध्ये आंदोलन चिघळले;५० ब्रिटिश खासदारांनीही व्यक्त केली चिंता
लंदन, 09 जून (हिं.स.)।पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीरमधील मुजफ्फराबाद येथे पाकिस्तानी सुरक्षा दलांनी काश्मिरी आंदोलनकर्त्यांवर कठोर दडपशाही केल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलन करणाऱ्या लोकांवर अश्रुधूराच्या नळकांड्या फेकण्यात आल्याचे वृत्त आ
पीओकेमध्ये आंदोलन चिघळले;५० ब्रिटिश खासदारांनीही व्यक्त केली चिंता


लंदन, 09 जून (हिं.स.)।पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीरमधील मुजफ्फराबाद येथे पाकिस्तानी सुरक्षा दलांनी काश्मिरी आंदोलनकर्त्यांवर कठोर दडपशाही केल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलन करणाऱ्या लोकांवर अश्रुधूराच्या नळकांड्या फेकण्यात आल्याचे वृत्त आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांतील अहवालांनुसार, 30 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याच्या अपुष्ट बातम्याही समोर आल्या आहेत. मोठ्या संख्येने लोक जखमी झाल्याचेही सांगितले जात आहे.या संवेदनशील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत 50 हून अधिक ब्रिटिश खासदारांनी परराष्ट्र मंत्री यवेट कूपर यांना पत्र लिहिले आहे.

ब्रॅडफर्ड ईस्टचे खासदार इमरान हुसेन यांनी आपल्या पत्रात इंटरनेट आणि मोबाईल सेवांवरील निर्बंधांचा उल्लेख केला आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, “सततचा लॉकडाऊन, संपर्क व्यवस्थेवरील बंदी, अटकसत्र आणि वाढता तणाव याबाबतच्या बातम्यांमुळे आम्ही चिंतित आहोत.” हुसेन यांनी सरकारने सर्व राजनैतिक मार्गांचा वापर करण्याची मागणी केली असून, काश्मिरी जनतेच्या मानवाधिकारांचा आदर राखत शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. खासदारांनी असेही नमूद केले की, अनेक ब्रिटिश-काश्मिरी नागरिकांचा पीओकेमधील त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क तुटला आहे.

दरम्यान, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील (पीओके) रावळकोट येथे आंदोलनकर्त्यांवर अंधाधुंद गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेत सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला असून 70 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीर जॉइंट आवामी अॅक्शन कमिटी (जेएएसी) ने पाकिस्तानी सैन्य आणि सुरक्षा दलांवर गंभीर आरोप केले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, जेएएसी चे आंदोलनकर्ते एका रुग्णालयाच्या शवागाराबाहेर जमले होते. पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या एका सदस्याच्या स्मरणार्थ ते शोकसभा आयोजित करत होते. पुंछ विभागाचे आयुक्त सरदार वहीद खान यांनी सांगितले की, आंदोलनकर्त्यांच्या गोळीबारात चार पोलिस अधिकारी आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईत सहा आंदोलनकर्ते ठार झाले. पोलिस प्रमुख लियाकत मलिक यांनी सांगितले की, रविवारी झालेल्या घटनेत 23 सुरक्षा कर्मचारी आणि 50 आंदोलनकर्ते जखमी झाले होते. याशिवाय 30 जणांना अटकही करण्यात आली आहे.

जेएएसी ही संघटना आर्थिक आणि राजकीय हक्कांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे. मात्र पाकिस्तान सरकारने तिच्यावर बंदी घातली आहे. प्रादेशिक सरकारने शुक्रवारी दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत जेएएसी ला प्रतिबंधित संघटना घोषित केले. जेएएसी ने 27 जुलै रोजी होणाऱ्या प्रादेशिक विधानसभेच्या निवडणुकांच्या निषेधार्थ मंगळवारी बंदची हाक दिली आहे. विधानसभेतील 45 पैकी 12 जागा निर्वासितांसाठी राखीव आहेत. या जागांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांऐवजी पाकिस्तानच्या इतर भागांतील लोकांना या जागांसाठी नामनिर्देशित केले जाते, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.जेएएसी चे नेते शौकत मीर यांनी आरोप केला की, सरकारने रावळकोटमध्ये लोकांची कत्तल सुरू केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande