
वॉशिंग्टन, 09 जून, (हिं.स.)टेनिसमधील माजी जागतिक क्रमांक आणि पाच वेळा 'अमेरिकन ओपन'चे विजेतेपद पटकावणारा रॉजर फेडरर न्यूयॉर्कमध्ये परतणार आहे. 'युनायटेड स्टेट्स टेनिस असोसिएशन'ने जाहीर केल्यानुसार, तो या वर्षी २५ ऑगस्ट रोजी 'अमेरिकन ओपन'मध्ये एका प्रदर्शनीय सामन्यात सहभागी होणार आहेत. ४४ वर्षीय फेडरर हे २००४ ते २००८ या काळात सलग पाच वेळा 'अमेरिकन ओपन'चे विजेतेपद जिंकणारा एकमेव टेनिसपटू आहे.
२०२२ मध्ये निवृत्ती जाहीर करण्यापूर्वी त्याने २०१९ मध्ये या ग्रँडस्लॅम स्पर्धेत अखेरचा सहभाग नोंदवला होता. रॉजर फेडरर: ॲन आयकॉन रिटर्न्स टू न्यूयॉर्क या शीर्षकाखाली होणाऱ्या या प्रदर्शनीय सामन्यात अँडी रॉडिक, जॉन मॅकेनरो आणि आंद्रे अगासी यांचाही सहभाग असणार आहे.
हा सामना 'आर्थर ॲश स्टेडियम'वर 'फॅन वीक' दरम्यान खेळवला जाईल. 'फॅन वीक' हा मुख्य एकेरी स्पर्धेच्या (सिंगल्स ड्रॉ) सुरुवातीच्या आठवड्याआधी आयोजित केला जाणारा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर २०२६ ची 'अमेरिकन ओपन' स्पर्धा होणार आहे.
माझ्या कारकिर्दीतील अनेक अविस्मरणीय क्षण न्यूयॉर्कमध्ये घडले आहेत आणि 'आर्थर ॲश स्टेडियम' हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे, असे फेडररने सांगितले. त्या वातावरणाचा भाग होणे आणि दरवर्षी चाहत्यांकडून मिळणारी अविश्वसनीय ऊर्जा अनुभवणे याची मला खूप आठवण येत होती, असेही या टेनिस दिग्गजाने नमूद केले.
हा सामना रॉजर फेडररचा 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होण्यापूर्वी आयोजित केला जात आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकणाऱ्या, तसेच २० ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपदे आणि १०३ टूर-स्तरीय ट्रॉफी जिंकणाऱ्या फेडररची निवड पात्रतेच्या पहिल्याच वर्षी करण्यात आली. हा सोहळा २९ ऑगस्ट रोजी होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे