
रायगड, 09 जून (हिं.स.) : म्हसळा तालुक्यातील साई चेक पोस्ट येथे पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान विनापरवाना रेती वाहतूक करणारा डंपर पकडण्यात आला असून सुमारे 9 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेत येथील चालक टाटा कंपनीचा मिनी हायवा डंपर (क्र. एमएच-10 ईजे-5876) घेऊन गोरेगावकडून म्हसळ्याकडे जात होता. साई चेक पोस्ट येथे पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गौण खनिज असलेली रेती वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी चालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना व रॉयल्टीबाबत चौकशी केली असता कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी डंपरसह रेती असा एकूण 9 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 85/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7)(8) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 15 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सुर्वे करीत आहेत.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)