
मनमाड, 09 जून (हिं.स.) : फिरोजपूर–मुंबई पंजाब मेल या गाडीत प्रवास करणाऱ्या एका व्यापाऱ्याची ९१ लाख ३४ हजार २९५ रुपयांची रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असलेली बॅग चोरीस गेल्याची मोठी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आधी मुंबई लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तपासात घटना मनमाड परिसरात घडल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा मनमाड लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
लोहमार्ग पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत व्यापक शोधमोहीम राबवली. या तपासात दोन संशयित आरोपी निष्पन्न झाले. पोलिसांनी पुणे येथे धाड टाकून आरोपी लक्ष्मण भाभा राम याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार राजू परिहार याच्यासोबत मिळून चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलिसांनी ८० लाख ९४ हजार २९५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे फिर्यादी नरेश जाट याचा देखील या गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आरोपी राजू परिहार फरार असून त्याचा कसून शोध सुरू आहे.
ही चोरी पंजाब मेल मनमाड स्थानकात थांबलेली असताना घडली. फिर्यादी बाथरूमला गेले असताना बॅग चोरीस गेल्याचे समोर आले. बॅगमध्ये रोख रक्कमेसह मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने व नाणी होती. घटनेनंतर तपासासाठी विविध पथके तयार करण्यात आली होती.
छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस अधिक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय अधिकारी व रेल्वे सुरक्षा दलाच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली. तपास पथकाने सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यास यश मिळवले.
रेल्वे परिसरातील ही एक मोठी आणि गंभीर चोरी मानली जात असून पोलिसांनी उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी व फरार आरोपीला पकडण्यासाठी मोहीम तीव्र केली आहे. या प्रकरणामुळे रेल्वे प्रवासातील सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV