
वॉशिंग्टन , 09 जून (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, पुढील दोन आठवड्यांत अमेरिका आणि इराणमधील सुरू असलेल्या वादात अमेरिकेला पूर्ण यश मिळेल. त्यांनी सांगितले की, इराणसोबतच्या अणुकराराबाबतची चर्चा योग्य दिशेने पुढे जात असून लवकरच मोठा परिणाम समोर येऊ शकतो.
आभासी निवडणूक कार्यक्रमादरम्यान बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटी सुरू आहेत आणि तेहरान आता करारासाठी तयार असल्याचे दिसत आहे. त्यांच्या मते, इराण अण्वस्त्रे विकसित न करण्यासह अमेरिकेच्या प्रमुख मागण्या स्वीकारण्यास तयार आहे. ट्रम्प म्हणाले, “आम्ही सध्या चर्चा करत आहोत आणि त्यांना एक चांगला करार करायचा आहे. ते आम्हाला हवे ते सर्व देण्यास तयार आहेत. अण्वस्त्रे न बाळगण्यासही ते तयार आहेत.”
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दावा केला की, पुढील दोन आठवड्यांत परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते. अमेरिका आपल्या पूर्ण विजयाची घोषणा करेल, तेव्हा त्याचा परिणाम जागतिक तेलबाजारावरही होईल आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये घट होऊ शकते, असे त्यांनी म्हटले.
ट्रम्प यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा अलीकडच्या काळात वाढलेला इराण-इस्रायल संघर्ष काहीसा कमी होताना दिसत आहे. दोन्ही देशांनी नुकतेच एकमेकांवर प्रत्युत्तरात्मक हल्ले केले होते, ज्यामुळे या प्रदेशात व्यापक युद्धाची भीती निर्माण झाली होती. मात्र आता दोन्ही बाजूंनी आपापल्या लष्करी मोहिमा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणविरुद्धचे हल्ले थांबवल्याची पुष्टी केली आहे. मात्र, त्यांनी औपचारिक युद्धविरामाला पाठिंबा देण्याची घोषणा केलेली नाही. दुसरीकडे, इराणनेही इस्रायलविरुद्धची लष्करी कारवाई थांबवल्याचे सांगितले आहे. मात्र, इस्रायलकडून पुन्हा हल्ला झाल्यास तात्काळ प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, इराणकडूनही अमेरिका सोबत शांतता चर्चा सुरू ठेवण्याबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत. एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिका प्रामाणिकपणे चर्चा करत असल्यास तेहरानला वाटाघाटी पुढे नेण्यात कोणतीही अडचण नाही.
मात्र, कराराच्या कालमर्यादेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका दूरचित्रवाणी कार्यक्रमात ट्रम्प यांना विचारण्यात आले की, इराण इतक्या कठीण परिस्थितीत असतानाही अद्याप करारावर स्वाक्षरी का करत नाही? त्यावर त्यांनी उत्तर दिले की, इराणी नेतृत्व मजबूत आणि स्वाभिमानी आहे. त्यामुळे काही अटी स्वीकारणे त्यांच्यासाठी सोपे नाही आणि याच कारणामुळे प्रक्रियेला वेळ लागत आहे.
विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी यापूर्वीही अनेकदा दोन आठवड्यांच्या कालमर्यादेचा उल्लेख केला आहे. एप्रिलमध्ये जाहीर झालेल्या युद्धविरामाच्या वेळीही त्यांनी दोन आठवड्यांत कायमस्वरूपी करार होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी दावा केला आहे की, पुढील दोन आठवडे अमेरिका-इराण संबंधांसाठी तसेच मध्यपूर्वेतील राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode