
मुंबई, 09 जून, (हिं.स.) कपबशी चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पुणे येथून सांगली येथे जात असताना सातारा जिल्ह्यातील काशीळ येथे 3 वाहने एकमेकांवर आदळून कार अपघात झाला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नसून मुका मार लागला आहे. सदर प्रवासात अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे या गाडीतून प्रवास करत होते. गाडीचे नुकसान झाले असून गाडीतील सर्वजण हे सुखरूप आहेत.
हा चित्रपट येत्या १९ जूनला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेने कप बशी या चित्रपटाची निर्मिती केली असून कल्पक सदानंद जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर बिग ब्रेन प्रॉडक्शन्सच्या निलेश रामगोपाल राठी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची पटकथा , संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिले असून दिग्दर्शन वैभव रामकृष्ण चिंचाळकर यांचे आहे.कप बशी चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला पहिल्यांदाच सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. गुरु ठाकूर यांनी गीतलेखन, बाळू दहिफळे यांनी कॅमेरामन तर संकलक म्हणून आशिष म्हात्रे यांनी काम पाहिले आहे . राष्ट्रीय पुरस्कार विजेते मंदार कमलापूरकर यांनी ध्वनी संयोजक तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्रीकांत देसाई यांनी लूक डिझायनर म्हणून काम पाहिले आहे. नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे, कला दिग्दर्शन महेश कुडाळकर तर प्रोजेक्ट हेड म्हणून चिन्मय शिंत्रे यांनी काम पाहिले आहे.चित्रपटात अभिनेत्री निर्मिती सावंत, पूजा सावंत, नवोदित चेहरा ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, आनंद काळे, चिन्मय शिंत्रे ,उमा सरदेशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर