
लंडन, 09 जून (हिं.स.) : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन यांच्यावर संघ नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाची चौकशी सुरू केली आहे.
ईसीबीने मंगळवारी सांगितले की, न्यूझीलंडविरुद्धची पहिली कसोटी संपल्यानंतर सोमवारी पहाटे हे दोन्ही खेळाडू एका नाईटक्लबमध्ये उपस्थित होते. बोर्ड सध्या या प्रकरणाची चौकशी करत असून अतिरिक्त माहिती गोळा करत आहे. पण, नाईटक्लबमध्ये नेमके काय घडले किंवा या कथित उल्लंघनाचे स्वरूप काय होते, हे ईसीबीने अद्याप स्पष्ट केलेले नाही. चौकशी पूर्ण झाल्यावरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
दोषी आढळल्यास दोन्ही क्रिकेटपटूंना दुसऱ्या कसोटीतून वगळले जाऊ शकते. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरी कसोटी १७ जूनपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळवली जाईल. ईसीबीने सांगितले की, न्यूझीलंडविरुद्धची पहिली कसोटी संपल्यानंतर संघ नियमांच्या उल्लंघनाची चौकशी सुरू आहे. सोमवारी पहाटे ज्या नाईटक्लबमध्ये ही घटना घडली, तिथे बेन स्टोक्स आणि गस ॲटकिन्सन उपस्थित होते.
बोर्डाने हे देखील स्पष्ट केले आहे की, तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ नंतर जाहीर केला जाईल. लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला ११५ धावांनी पराभूत करून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे.
या विजयात संघाचा कर्णधार स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज ॲटकिन्सन हे प्रमुख क्रिकेटपटू होते. विशेषतः ॲटकिन्सनने पहिल्या कसोटीत सात बळी घेत उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे, दुसऱ्या कसोटीपूर्वी या दोन्ही क्रिकेटपटूंची संभाव्य अनुपस्थिती इंग्लंडसाठी चिंतेचे कारण ठरू शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे