
नवी दिल्ली, 09 जून (हिं.स.) : भारतीय फलंदाज विराट कोहलीने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघासाठी खास का आहे. त्याने संघाला सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आणि एका भावनिक संदेशासह या यशाचा आनंद साजरा केला. आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सवर आरसीबीने पाच गडी राखून विजय मिळवल्यानंतर जवळपास एका आठवड्याने, आरसीबीच्या या माजी कर्णधाराने सोशल मीडियावर आपल्या प्रवासावर भाष्य केले.
विराटने सोशल मीडियावर लिहिले की, आत्मविश्वासाने हंगामाची सुरुवात केली आणि सलग दोन विजेतेपदे जिंकून त्याचा शेवट केला. या संघाने एकत्र प्रत्येक भावना अनुभवली: विजयाचा आनंद, दडपण, अडचणी आणि अतूट नाते. हे ठिकाण खास आहे कारण हे माझे घर आहे.
अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, आरसीबीने गुजरात टायटन्सला १५५/८ धावांवर रोखले आणि त्यानंतर १८ षटकांत सहजपणे लक्ष्य गाठले होते. कोहलीने ४२ चेंडूंमध्ये नऊ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद ७५ धावा केल्या. त्यानेच विजेतेपद निश्चित करणारा विजयी फटकाही मारला. आरसीबीचे हे सलग दुसरे विजेतेपद होते, ज्यामुळे २०२५ मधील ट्रॉफीची त्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. कोहली म्हणाला की, संघ गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आत्मविश्वासाने अंतिम सामन्यात उतरला होता.
अंतिम सामन्यानंतर कोहलीने काही क्रिकेटपटूंना सांगितले की, गेल्या वर्षीसारखा दबाव त्यांना यावेळी जाणवत नव्हता. त्याला आपल्या संघाची क्षमता माहीत होती. ते गुणतालिकेत अव्वल स्थानी होते. ते तिथे प्रथम पोहोचले यामागे एक कारण आहे. २००८ मध्ये आयपीएलच्या सुरुवातीपासून आरसीबीकडून खेळणाऱ्या कोहलीचे या फ्रँचायझीसोबतचे नाते बहुतेक क्रिकेटपटू आणि संघांपेक्षा अधिक घट्ट आहे. त्याचा अलीकडील संदेश चाहत्यांच्या मनाला भिडला, ज्यांपैकी अनेकांनी त्याला त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत आरसीबीकडून खेळताना पाहिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे