अहमदपूर खून प्रकरणातील फरार आरोपी नांदेड जिल्ह्यातून जेरबंद
लातूर, 01 जुलै (हिं.स.)। अहमदपूर खूनप्रकरणातील फरार आरोपी नांदेड जिल्ह्यातून जेरबंद; तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे कारवाई अहमदपूरजवळील लांजी गावाच्या गायरान परिसरात सुमारे २० दिवसांपूर्वी घडलेल्या खूनप्रकरणातील फरार आरोपीला लातूरच्य
पोलीस कारवाई


लातूर, 01 जुलै (हिं.स.)। अहमदपूर खूनप्रकरणातील फरार आरोपी नांदेड जिल्ह्यातून जेरबंद; तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

अहमदपूरजवळील लांजी गावाच्या गायरान परिसरात सुमारे २० दिवसांपूर्वी घडलेल्या खूनप्रकरणातील फरार आरोपीला लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने नांदेड जिल्ह्यातून जेरबंद केले आहे. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी अहमदपूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या गंभीर गुन्ह्याचा तातडीने उलगडा करून आरोपीला अटक करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती.

गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने आरोपीच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले. या तपासादरम्यान अहमदपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९९/२०२६, कलम १०३(२) भारतीय न्याय संहिता मधील फरार आरोपी बालाजी बाबू जाधव (वय ३९, रा. मुगाव तांडा, ता. नायगाव, जि. नांदेड) हा मुखेडजवळील सलगरा फाटा परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पाठलाग करून शिताफीने अटक केली.

चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, तो आणि त्याचा सहकारी गोविंद फटाटे (रा. नावंदी, ता. उदगीर, जि. लातूर) हे अहमदपूर येथे मिस्त्रीचे काम करून मजुरी घेतल्यानंतर दारूचे सेवन करून लांजी गावाजवळील गायरान परिसरात जेवणासाठी थांबले होते. कामाच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने टॉवेलने मृताचे हात बांधून गळ्यातील गमछ्याने गळा आवळून त्याचा खून केल्याची कबुली दिली.आरोपीला पुढील तपासासाठी अहमदपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande