
जळगाव, 01 जुलै (हिं.स.) भुसावळामधील संशयास्पद स्थितीत आढळलेल्या संतोष रघुवीर मंचाल (वय ५५) यांच्या हत्येचा भुसावळ शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. रेल्वेचे लोखंडी स्क्रॅप (लोखंड) चोरी करण्याच्या वादातून ही निर्घृण हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. भुसावळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक श्रीकांत ढेरे यांनी या खळबळजनक गुन्ह्याची सविस्तर माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित ‘बॉक्सर’ हर्षल वर्मा याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. २८ जून २०२६ च्या रात्री भुसावळ शहरातील मिलिटरी स्टेशन कॅम्पसच्या मागे, भुसावळ-खंडावा डाउन लाईनला लागून असलेल्या कालिका माता मंदिर जवळ
संतोष मंचाल यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, घटनास्थळी कोणतेही हत्यार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा मोबाईल लोकेशनसारखे तांत्रिक पुरावे उपलब्ध नसल्याने हा ‘ब्लाईंड मर्डर’ पोलिसांसमोर एक मोठे आव्हान बनला होता.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत ढेरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि भुसावळ शहर पोलिसांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. तांत्रिक पुरावे नसले तरी पोलिसांनी ‘ह्युमन इंटेलिजन्स’च्या (मानवी गुप्त माहिती) आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
या गुन्ह्याचा उलगडा होण्यात दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या आहे. त्यात पहिला म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट. संतोष मंचाल यांच्या जबड्यावर आणि बरगड्यांवर भीषण प्रहार केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यात कोणत्याही हत्याराचा वापर झाला नव्हता. त्यामुळे मारेकरी एखादा खेळाडू किंवा बॉक्सर असावा, असा संशय पोलिसांना आला. याच दरम्यान पोलिसांच्या हाती घटनेच्या रात्रीचा एका हळदी समारंभातील मारहाणीचा व्हिडिओ लागला. यामध्ये परिसरात ‘बॉक्सर’ म्हणून ओळखला जाणारा हर्षल राजू वर्मा हा एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसत होता. याच धाग्यावरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत हर्षल राजू वर्मा, क्षितिज संजय भालेराव आणि प्रफुल उत्तम जाधव या तिघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या संशयितांची जेव्हा पोलिसांनी कसून चौकशी केली, तेव्हा त्यांनी गुन्ह्याची थरारक कबुली दिली. आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, गुन्ह्याच्या रात्री हे तिघे रेल्वेचे लोखंडी स्क्रॅप चोरी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी तिथे आलेल्या संतोष मंचाल यांनी त्यांना चोरी करण्यापासून रोखले व विरोध केला. यावरून त्यांच्यात तीव्र वाद झाला. रागाच्या भरात आरोपींनी (ज्यात बॉक्सर हर्षलचा मुख्य सहभाग होता) मंचाल यांना लाथाबुक्क्यांनी इतकी अमानुष मारहाण केली की, त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ अनुभवाचा अंदाज आणि गुप्तहेरांच्या अचूक माहितीच्या जोरावर भुसावळ पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत तिन्ही आरोपींना जेरबंद केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर