लोहगड हत्याकांड : आरोपींना घटनास्थळी नेऊन पुराव्यांची पडताळणी
पुणे, १ जुलै (हि.स.) : लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल यांच्या कथित हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेले सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयाने ३ जुलैपर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आरोपी चेतन चौध
Ketan


पुणे, १ जुलै (हि.स.) : लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल यांच्या कथित हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेले सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयाने ३ जुलैपर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आरोपी चेतन चौधरी याला कडेकोट बंदोबस्तात लोहगड किल्ल्यावर नेऊन घटनेचा घटनाक्रम पुन्हा उभा केला. या वेळी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि तपास पथक घटनास्थळी उपस्थित होते.

तपासादरम्यान आरोपीकडून घटनास्थळावरील विविध बाबींची पडताळणी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेतून घटनेचा नेमका क्रम, आरोपींच्या हालचाली आणि उपलब्ध पुराव्यांची तपासणी करण्यात आली.

१८ जून रोजी केतन अग्रवाल यांचा लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे मानले जात होते. मात्र पुढील तपासात हा अपघात नसून पूर्वनियोजित कटातून घडवून आणलेला खून असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणात केतन अग्रवाल यांच्यासोबत लोहगडावर गेलेली त्यांची होणारी पत्नी सिया गोयल हिला मुख्य आरोपी करण्यात आले असून, तिचा मित्र चेतन चौधरी यालाही सहआरोपी करण्यात आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही आरोपींनी मिळून केतन अग्रवाल यांना दरीत ढकलल्याची कबुली तपासादरम्यान दिल्याचेही समोर आले आहे.

लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून, घटनास्थळावरील पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पुढील कार्यवाही सुरू आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande