
-मॅट फिशरला पहिल्यांदाच संधी, जेकब डफीचे पुनरागमन
वेलिंग्टन, १ जुलै (हिं.स.) - न्यूझीलंड क्रिकेटने बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली. वेगवान गोलंदाज मॅट फिशरचा एकदिवसीय संघात पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे, तर नुकत्याच झालेल्या इंग्लंड कसोटी दौऱ्यातून वगळण्यात आलेल्या जेकब डफीचे संघात पुनरागमन झाले आहे.
वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका ११ जुलै रोजी गयाना येथे सुरू होईल. पहिले तीन सामने ११, १३ आणि १६ जुलै रोजी खेळले जातील, तर शेवटचे दोन सामने १९ आणि २१ जुलै रोजी बार्बाडोस येथे खेळवले जातील.
मॅट फिशरने ऑगस्ट २०२५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि या वर्षाच्या सुरुवातीला बांगलादेशविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने २५ लिस्ट ए सामन्यांमध्ये २६ च्या सरासरीने ४३ बळी घेतले आहेत. दरम्यान, मार्चमध्ये झालेल्या टी२० विश्वचषक अंतिम सामन्यानंतर जेकब डफीने पहिल्यांदाच न्यूझीलंड संघात पुनरागमन केले आहे. विश्वचषकानंतर तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून खेळला होता. पण पहिल्या मुलाच्या जन्मामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकला नव्हता.
मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर म्हणाले, मॅट आणि जेकब या दोघांच्या समावेशामुळे आमचा संघ अधिक मजबूत होईल. मॅटला पहिल्यांदाच एकदिवसीय संघात स्थान मिळणे ही त्याच्यासाठी एक मोठी उपलब्धी आहे. तो वेगवान गोलंदाजी करतो आणि सामन्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रभावी ठरण्यासाठी आपल्या गोलंदाजीतील विविधतेवर सातत्याने काम करत असतो.त्यांनी डफीचे कौतुक करत म्हटले की, गेल्या दोन वर्षांत त्याने सर्व फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि त्याचा अनुभव संघासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
मिचेल सँटनर संघाचे कर्णधारपद भूषवेल. फिरकी गोलंदाजी विभागात मायकल ब्रेसवेल, जेडन लेनॉक्स आणि डीन फॉक्सक्रॉफ्ट यांचा समावेश आहे. लेनॉक्सने या वर्षी जानेवारीमध्ये भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि हा त्याचा तिसरा परदेशी मर्यादित षटकांचा दौरा असेल.
मायकल ब्रेसवेल आणि मार्क चॅपमन हे देखील अलीकडील आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून बाहेर राहिल्यानंतर संघात परतले आहेत. व्यस्त वेळापत्रकामुळे न्यूझीलंडने वेगवान गोलंदाज काईल जेमिसन, मॅट हेन्री आणि विल ओ'रूर्क यांना विश्रांती दिली आहे. घोट्याच्या शस्त्रक्रियेमुळे ब्लेअर टिकनर अनुपलब्ध असेल.डेव्हॉन कॉनवे त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे प्रवास करणार नाही, तर रचिन रवींद्र मेजर लीग क्रिकेटमध्ये पूर्वीच नियोजित सहभागामुळे अनुपलब्ध असेल.
न्यूझीलंडचा एकदिवसीय संघ:
मिचेल सँटनर (कर्णधार), मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, ख्रिश्चन क्लार्क, जेकब डफी, मॅट फिशर, डीन फॉक्सक्रॉफ्ट, मिच हे, निक केली, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), जेडन लेनॉक्स, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, बेन सियर्स, नॅथन स्मिथ आणि विल यंग.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे