
परभणी, 01 जुलै (हिं.स.)। जिंतूर तालुक्यातील बोरी पोलिसांनी प्रतिबंधित औषधांची अवैधरित्या वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत सुमारे १ लाख ७० हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
बोरीच्या परभणी रोडवरील वाघी रोड परिसरात पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर धाडसी कार्यवाही केली. या प्रकरणात या दोघांवर गुन्हा दाखल केला असून यातील पहिल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसऱ्या आरोपीचा शोध अद्याप चालू आहे. या कारवाईत पोलिसांनी मेफेनटरमाईन सल्फेट या नावाची इंजेक्शनची हिरव्या व पांढऱ्या रंगाची १० पाकिटे, एक मोटार सायकल व एक विवो कंपनीचा मोबाईल तसेच अन्य साहित्य असा एकूण १ लाख ७० हजार ३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम आणि संबंधित कायद्यांतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरिक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, एस. एन. थोरवे, पोलीस जमादार राजेश जटाळ, तपासणीक अंमलदार घोरपडे पुढील तपास करत आहेत.
_________
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis