‘मालिकांचा बादशहा’ दिग्दर्शक अजय मयेकर आता रुपेरी पडद्यावर
मुंबई, 01 जुलै, (हिं.स.)। मराठी दूरचित्रवाणी विश्वाला अनेक अजरामर मालिका देणारे दिग्दर्शक अजय मयेकर आता मोठ्या पडद्यावर नवा अध्याय लिहिण्यास सज्ज झाले आहेत. ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘काहे दिया परदेस’, ‘अग्गंबाई सासूबाई’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’, ‘कम
दिग्दर्शक अजय मयेकर


मुंबई, 01 जुलै, (हिं.स.)। मराठी दूरचित्रवाणी विश्वाला अनेक अजरामर मालिका देणारे दिग्दर्शक अजय मयेकर आता मोठ्या पडद्यावर नवा अध्याय लिहिण्यास सज्ज झाले आहेत. ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘काहे दिया परदेस’, ‘अग्गंबाई सासूबाई’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’, ‘कमला’, ‘छत्रीवाली’ आणि ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’, ‘बाबासाहेब आंबेडकर’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अजय मयेकर यांचा ‘मर्दिनी’ हा पहिलाच दिग्दर्शकीय मराठी चित्रपट आता ३ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

दोन दशकांहून अधिक काळ आपल्या संवेदनशील, आशयघन आणि भावनिक कथनशैलीने प्रेक्षकांना बांधून ठेवणाऱ्या अजय मयेकर यांनी मराठी मनोरंजनविश्वात वेगळा ठसा उमटवला आहे. नातेसंबंध, सामाजिक वास्तव आणि संस्कृतीचा सुरेख मिलाफ त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत पाहायला मिळतो. ‘कमला’सारख्या सामाजिक विषयावरील मालिकेपासून ते ‘माझी तुझी रेशीमगाठ’सारख्या लोकप्रिय मालिकांपर्यंत त्यांनी प्रत्येक वेळी वेगळा आशय आणि दर्जेदार मांडणी सादर केली.

विशेष म्हणजे, २०२४ मध्ये जगातील पहिली एआय आधारित मराठी मालिका ‘तू भेटशी नव्याने’ दिग्दर्शित करत त्यांनी तंत्रज्ञान आणि कथाकथनाचा अभिनव संगम घडवून आणला. आता त्याच नावीन्यपूर्ण दृष्टिकोनासह ते ‘मर्दिनी’च्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत नवी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज आहेत.

आता ‘मर्दिनी’ प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले जात आहे. ट्रेलरमधील दमदार मांडणी, प्रभावी विषय आणि कलाकारांच्या अभिनयाची विशेष चर्चा होत आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांकडूनही ट्रेलरला सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या असून, ट्रेलरला मिळालेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘मर्दिनी’बाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ट्रेलरने प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या असून, चित्रपटालाही तितकेच प्रेम मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

‘मर्दिनी’ हा केवळ अजय मयेकर यांचा पहिला दिग्दर्शकीय चित्रपट नसून, त्यांच्या दीर्घ अनुभवाचा, संवेदनशील दृष्टीकोनाचा आणि प्रभावी कथाकथनाचा मोठ्या पडद्यावरील विस्तार मानला जात आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टीतही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

याबद्दल दिग्दर्शक अजय मयेकर म्हणाले, “दूरचित्रवाणीने मला प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचवलं, त्यांचं प्रेम आणि विश्वास दिला. ‘मर्दिनी’ हा माझा पहिला मराठी चित्रपट असून अनेक वर्षांच्या अनुभवातून, निरीक्षणातून आणि मनापासून सांगायच्या एका प्रभावी कथेला मोठ्या पडद्यावर साकार करण्याचा हा प्रवास आहे. चित्रपटसृष्टीतील माझ्या काही मित्रपरिवाराने हा चित्रपट पाहिला असून, त्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक आहेत. त्यांच्या प्रतिक्रियांमुळे माझा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. ट्रेलरलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. आता अवघ्या काही दिवसांत ‘मर्दिनी’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाचा कसा स्वीकार करतील, त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील, याची सर्वाधिक उत्सुकता आणि प्रतीक्षा आहे.”

मराठी मालिकांना नवा आयाम देणारे अजय मयेकर आता ‘मर्दिनी’च्या माध्यमातून रुपेरी पडद्यावरही आपली वेगळी छाप सोडण्यास सज्ज आहेत. त्यामुळे ‘मर्दिनी’ हा चित्रपट केवळ त्यांच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट नसून, एका यशस्वी दिग्दर्शकाच्या नव्या पर्वाची दमदार सुरुवात ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande