रत्नागिरी : अवैध गोवंशीय वाहतूक, अवैध मांस विक्रीविरोधात पोलिसांची विशेष मोहीम
रत्नागिरी, 1 जुलै (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यात गोवंशीय हत्या, गोवंशीय अवैध वाहतूक, अवैध मांस विक्री तसेच संबंधित इतर बेकायदेशीर कृत्यांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक विशेष प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेण्यात आल
रत्नागिरी : अवैध गोवंशीय वाहतूक, अवैध मांस विक्रीविरोधात पोलिसांची विशेष मोहीम


रत्नागिरी, 1 जुलै (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यात गोवंशीय हत्या, गोवंशीय अवैध वाहतूक, अवैध मांस विक्री तसेच संबंधित इतर बेकायदेशीर कृत्यांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक विशेष प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवली जात असून, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना संबंधित कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६, प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ या कायद्यांनुसार गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जात आहे.

जिल्ह्यातील या अवैध कृत्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी २३ मे २०२६ पासून जिल्हास्तरावर चार विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून, ही पथके एकूण चार पोलीस उपविभागांमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. या पथकांमध्ये खेड उपविभागाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, चिपळूण उपविभागाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, रत्नागिरी उपविभागाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे आणि राजापूर उपविभागाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या भरारी पथकांना गोवंशीय तस्करी, हत्या किंवा अवैध मांस विक्रीबाबत कोणतीही माहिती मिळताच तातडीने छापे टाकून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यांच्याकडून संबंधित कार्यक्षेत्रात सातत्याने गस्त व तपासणी मोहीम राबवली जात आहे.

या गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी होणाऱ्या व्यक्ती किंवा संघटित टोळ्यांवर जरब बसवण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी कडक इशारा दिला आहे. अशा संघटित स्वरूपातील गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ म्हणजेच ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्पष्ट केले आहे. या संपूर्ण विशेष मोहिमेचे मुख्य नोडल अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांची नियुक्ती करण्यात आली असून, गावपातळीवर प्रभावी माहिती संकलन व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांची नोडल समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने या मोहिमेत नागरिकांना सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

गोवंशीय अवैध वाहतूक, तस्करी किंवा हत्येसारख्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन ढेरे (९०११९९५७७७), संबंधित भरारी पथकातील पोलीस अधिकारी, आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक ‘डायल ११२’ किंवा थेट पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या ८८५७८४८१५७ या मोबाइल क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे. तसेच माहिती देणाऱ्या जागरूक नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, अशी ग्वाहीदेखील पोलीस दलाकडून देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande